होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भिवंडीत काँग्रेसचे पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात

भिवंडीत काँग्रेसचे पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात

Published On: Jun 26 2018 1:15AM | Last Updated: Jun 26 2018 12:52AMभिवंडी : वार्ताहर

भिवंडी शहरातील समदनगर भागात 20 जून रोजी मध्यरात्री संशयास्पद स्थितीत फिरणार्‍या दोघांना स्थानिक युवकांनी भिवंडी पोलिसांच्या मदतीने पकडले. या दोघांच्या चौकशीदरम्यान धक्कादायक बाबी उघड होत असून, पोलिसांनी त्यासाठी शहरात कोम्बिंग ऑपरेशन सुरू करत काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक तथा माजी उपमहापौर अहमद सिद्दीकी, माजी नगरसेवक अलिमुद्दीन बक्कन सिद्दीकी, अशफाक सिद्दीकी यांना सोमवारी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या तिघांच्या दिवसभर सुरू असलेल्या चौकशीत असंख्य बाबी समोर येत असल्याने भिवंडीतील राजकीय वर्तुळात यामुळे एकच खळबळ माजली आहे.

भिवंडी शहर पोलीस स्टेशन क्षेत्रातील समदनगर परिसरात मोहम्मद साजीद निसार अन्सारी (30, रा. किडवाई नगर-शांतीनगर) व मोहम्मद दानिश मोहम्मद फारुक अन्सारी (20, रा. नागांव रोड-शांतीनगर) हे दोघे 20 जून रोजी दुपारपासून संशयास्पद फिरत होते. मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास सुद्धा सदर युवक परिसरात आढळून आल्याने स्थानिक युवक कल्लन याने शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधत इतर युवकांच्या मदतीने संशयास्पद फिरणार्‍या दोघांना हटकले असता त्यांनी दुचाकीवरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, या युवकांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या जवळून विदेशी बनावटीच्या 9 एमएम व 7.65 एमएम पिस्तूल, तीन मॅगझिन व 15 जिवंत काडतुसे आढळून आली.

याप्रकरणी शहर पोलीस स्टेशन येथे मोहम्मद साजीद निसार अन्सारी व मोहम्मद दानिश मोहम्मद फारुक अन्सारी यांच्या विरोधात भारतीय शस्त्र कायदा कलम 3(25), 37(1), 135 प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांना 24 जूनपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली होती. या दरम्यान या आरोपींचे मोबाईल सीडीआरसह प्रत्यक्ष चौकशीत धक्कादायक बाबी उघड झाल्याने पोलिसांनी या दोघांविरोधात भादंवि कलम 115, 120 ब, 307 प्रमाणे नवीन गुन्हा नोंदविला.