Sun, Feb 23, 2020 16:12होमपेज › Mumbai-Thane-Raigad › काँग्रेसच्या आमदार निर्मला गावित यांचा राजीनामा; उद्या शिवसेनेत प्रवेश

काँग्रेसच्या आमदार निर्मला गावित यांचा राजीनामा; उद्या शिवसेनेत प्रवेश

Published On: Aug 20 2019 2:38PM | Last Updated: Aug 20 2019 2:38PM

file photoमुंबईः विशेष प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेस पक्षातील गळती काही केल्या थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. नंदुरबारचे नऊ वेळा खासदार राहिलेले माणिकराव गावित यांचे पुत्र भरत गावित कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. तर, माणिकराव गावित यांच्या कन्या आणि इगतपुरीच्या आमदार निर्मला गावित उद्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. निर्मला गावित यांनी आपला आमदारकीचा राजीनामा विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्याकडे आज, मंगळवारी (दि. २०) राजीनामा सादर केला.

नंदुरबारमध्ये २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत माणिकराव गावितांना पराभव पत्करावा लागला होता. खरे तर हा मतदार संघ काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. परंतू डॉ. राजेंद्र गावित आणि हीना गावित यांच्या भाजप प्रवेशापासून या जिल्ह्याचे राजकारण बदलले. २०१९ मध्ये भरत गावित यांनी आपल्यासाठी लोकसभेची उमेदवारी मागितली होती. मात्र, काँग्रेसने त्यांना डावलून के. सी. पाडवी यांना तिकीट दिल्याने भरत गावित बंडखोरीच्या तयारीत होते. अखेर बंड शमवण्यात आले होते. पण लोकसभा निवडणुकीत भाजपच्या खासदार हीना गावितच दुसर्‍यांदा निवडून आल्या. त्यानंतर भरत गावित यांनाही आता भाजपप्रवेशाचे वेध लागले आहेत.

मानिकराव गावित म्हणजे निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्ते मानले जातात. ५२ वर्षे खासदारकी करत असताना माणिकराव गावित यांनी पक्षनिष्ठा कायम जपली. त्यांचा सर्व घटकांशी प्रेमभाव आणि मतदारसंघाशी बांधलेली घट्ट नाळ लक्षात घेता त्यांचे समर्थन करणारा भलामोठा कार्यकर्ता वर्ग या ठिकाणी आहे. पक्षाने माणिकराव गावित यांच्याऐवजी भरत गावित यांना उमेदवारी देऊन त्यांच्या या निष्ठेला आणि कार्याला न्याय द्यायला हवा होता, अशी भावना या ठिकाणी होती. मात्र, अखेर त्यांच्या कन्येने शिवसेनेची, तर पुत्राने भाजपची वाट धरली आहे.

भरत गावित जिल्हा परिषद सदस्य आणि नंदुरबार जिल्हा परिषदेचे अडीच वर्ष अध्यक्ष राहीले आहेत. तर वडील माणिकराव गावित हे सलग ९ वेळा नंदुरबार मतदारसंघात काँग्रेसचे खासदार, दोन वेळा केंद्रात राज्यमंत्री आणि लोकसभेचे हंगामी अध्यक्ष राहीले आहेत. बहीण निर्मला गावित या नाशिकमधील इगतपुरी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या विद्यमान आमदार आहेत. २००९ आणि २०१४ या दोन्ही विधानसभा निवडणुकीत त्यांचा विजय झाला होता. २०१४ मध्ये त्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केला होता. मात्र, आता या कुटुंबाचा निर्मय काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जातो.