Tue, Jul 16, 2019 21:54होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राम कदमांची जीभ कापण्याचा फतवा

राम कदमांची जीभ कापण्याचा फतवा

Published On: Sep 07 2018 12:12PM | Last Updated: Sep 07 2018 2:31PMनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

महिलांच्या बाबतीत वादग्रस्त वक्तव्य करून वाद ओढवून घेतलेल्या भाजप आमदार राम कदम यांची जीभ कापून आणणाऱ्यास पाच लाख बक्षीस देण्याचा फतवा काँग्रेस नेते व माजी मंत्री सुबोध साओजी यांनी काढला आहे. 'एएनआय' वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी राम कदम यांच्यावर सडकून टीका केली

साओजी म्हणाले की, एक लोकप्रतिनीधी म्हणून राम कदम यांना ही भाषा शोभत नाही, माझी महाराष्ट्रीयन जनतेला विनंती आहे की जो कोणी राम कदम यांची जीभ कापून आणेल त्याला ५ लाखांचे इनाम दिले जाईल. घाटकोपरमधील भाजप आमदार राम कदम यांनी दही हंडी कार्यक्रमात बोलताना अनेक मुक्ताफळे उधळताना आक्षेपार्ह विधाने केली. त्यामुळे त्यांच्याविरोधात संपूर्ण राज्यभरात जनभोक्ष उसळला आहे. बेताल वक्तव्यांमुळे राम कदम यांचे प्रवक्तेपद धोक्यात आल्याचे बोलले जात आहे.

भाजप आमदार राम कदम यांनी जर तुम्ही एखाद्या मुलीला प्रपोज केले असेल आणि ती मुलगी तुम्हाला पसंत असेल आणि ती लग्नाला नकार देत असेल तर मला सांगा, तिला पळवून आणण्यास मी मदत करेन असे आक्षेपार्ह विधान केले होते. आमदार राम कदम यांच्या या वक्तव्यांचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये जोरदार व्हायरल झाला. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने राम कदम यांच्यावर टीकेची झोड उठवली. राम कदम यांच्या पुर्वाश्रमीच्या मनसेने, तर बॅनरबाजी  करत त्यांचा समाचार घेतला. मनसेने घाटकोपर आणि मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानासमोर बॅनर लावले आहेत.