Fri, Dec 13, 2019 00:22होमपेज › Mumbai-Thane-Raigad › काँग्रेसमुक्त महाराष्ट्र हेच पहिले काम : चंद्रकांत पाटील

काँग्रेसमुक्त महाराष्ट्र हेच पहिले काम : चंद्रकांत पाटील

Published On: Jul 18 2019 1:56AM | Last Updated: Jul 18 2019 1:39AM
मुंबई : विशेष प्रतिनिधी 

काँग्रेसमुक्त महाराष्ट्र करणे हेच प्रदेशाध्यक्ष म्हणून आपले  पहिले प्राधान्य आहे, अशी गर्जना भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी पदभार स्वीकारल्यानंतर केली. विरोधी पक्षातील जे चांगले नेते भाजपमध्ये येऊ इच्छितात, त्यांना पक्षात प्रवेश दिला जाईल. काँग्रेसने एक नव्हे, पाच कार्याध्यक्ष नेमले असले तरी येत्या पंधरा दिवसांत काँग्रेसचा त्यापैकी एक कार्याध्यक्ष भाजपमध्ये आला तर आश्चर्य वाटू देऊ नका, असा सूचक इशाराही त्यांनी काँग्रेसला दिला. विधानसभेत नसले तरी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत बारामती हे आपले टार्गेट राहील, असेही ते म्हणाले. 

चंद्रकांत पाटील यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी, तर आ.  मंगलप्रभात लोढा यांची मुंबई भाजप अध्यक्षपदी मंगळवारी नियुक्ती करण्यात आली. पाटील यांनी बुधवारी प्रदेश कार्यालयात आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोघांचा सत्कार केला. 

सत्कारानंतर पत्रकार परिषदेत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी, निवडणुकीपूर्वी विरोधकांना धक्का देण्याचे सूतोवाच केले. ते म्हणाले, येणारी विधानसभा निवडणूक पाहता विरोधी पक्षातील चांगल्या नेत्यांना पक्षात प्रवेश देणे आणि पक्ष अधिक मजबूत करून काँग्रेसमुक्त महाराष्ट्र करणे, यावर आपला भर राहील. आपण बारामतीत घर घेतले आहे. प्रदेशाध्यक्ष झाल्यामुळे हे घर आणखी मजबूत करण्यास बळ मिळाले आहे. विधानसभा निवडणुकीत शक्य झाले नाही, तरी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत बारामती जिंकण्याचे   टार्गेट निश्चित केले आहे, असा इशारा त्यांनी शरद पवार यांनाही दिला. वोटिंग मशिनमध्ये गडबडीचा विरोधकांचा दावा खोटा व अपयश लपविण्यासाठी आहे. वोटिंग मशिनमध्ये कोणताही घोटाळा नाही असे सांगून, जर मशिनमध्ये घोटाळा करता येत असता तर आम्ही बारामतीची जागा हरलो नसतो, असेही ते म्हणाले. पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नावर बोलताना प्रत्येकवेळी प्रदेशाध्यक्षानेच मुख्यमंत्री व्हावे, असे काही समीकरण नसते, असे ते म्हणाले.