Sat, May 25, 2019 22:53होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पालघरमध्ये साम, दाम, दंड, भेदाचा विजय!

पालघरमध्ये साम, दाम, दंड, भेदाचा विजय!

Published On: Jun 01 2018 1:37AM | Last Updated: Jun 01 2018 1:17AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीतील विजय हा भाजपचा नसून साम, दाम, दंड, भेदाचा विजय असल्याची टीका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण म्हणाले, भाजपला या विजयाचा उत्सव साजरा करण्याचा अधिकार नाही. आज जाहीर झालेल्या पोटनिवडणुकांच्या निकालामध्ये देशभरात भाजपचा दारुण पराभव झाला आहे. लोकसभेच्या चार जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपला केवळ एका जागेवर विजय मिळविता आला. तर विधानसभेच्या 11 जागांच्या पोटनिवडणुकीत भाजपला फक्त एका जागेवर विजय मिळाला आहे. देशभरात समविचारी पक्ष एकत्र आल्याने भाजपचा पराभव झाला आहे.     

महाराष्ट्रात आज दोन ठिकाणी लोकसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी झाली. या दोन्ही जागा भाजपकडे होत्या. त्यातील भंडारा-गोंदियाची जागा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची आघाडी होती. त्या ठिकाणी आघाडीचे उमेदवार मधुकरराव कुकडे विजयी झाले आहेत. नाना पटोले यांनी भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारवर जे आरोप करून खासदारकीचा राजीनामा दिला, त्या आरोपांवर एकप्रकारे या निकालातून  शिक्कामोर्तब झाले आहे. हा मोदी सरकारचा मोठा पराभव असल्याचे चव्हाण म्हणाले.

पालघरमध्ये मतविभाजन झाल्यामुळे भाजपला ती जागा जिंकता आली, अन्यथा भंडार्‍याप्रमाणे येथेही भाजपचा पराभव झाला असता, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली. ते म्हणाले, बहुजन विकास आघाडीला काँग्रेस पक्षाने पाठिंबा द्यावा, अशी भूमिका आमची होती. असे झाले असते तर भाजपला पालघरही जिंकता आले नसते. भाजपने सत्तेचा दुरुपयोग करत, अफाट पैसा खर्च करत आणि सरकारी यंत्रणेचा वापर करत ही निवडणूक जिंकली, असा आरोपही नवाब मलिक यांनी केला.