Mon, Nov 18, 2019 22:08होमपेज › Mumbai-Thane-Raigad › काँग्रेस, राष्ट्रवादीत गळतीची चिन्हे

काँग्रेस, राष्ट्रवादीत गळतीची चिन्हे

Published On: Jul 13 2019 1:40AM | Last Updated: Jul 13 2019 1:53AM
मुंबई : उदय तानपाठक

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रातील काँग्रेसला मोठे खिंडार पाडण्यासाठी भाजपाने हालचाली सुरू केल्या आहेत. काँग्रेसचे अनेक आमदार स्वतःहून भाजपा आणि शिवसेनेच्या संपर्कात असून अनेकांना उमेदवारीसह अन्य आमिषे दाखवून पक्षात येण्यासाठी आमंत्रण दिले जात आहे. काँग्रेसचे किमान पाच आमदार स्वत:हून पक्ष सोडण्याच्या मनःस्थितीत असून आणखी काहीजणांना फोडण्यासाठी भाजपाचे प्रयत्न सुरू आहेत. कर्नाटक आणि गोव्यातील काँगे्रेसला गळती लागल्याने बेजार झालेल्या पक्षाला महाराष्ट्रातील संभाव्य गळतीची आणखी डोकेदुखी निर्माण झाली आहे. 

पंढरपूरचे आमदार भारत भालके यांनी गेल्या वर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विठ्ठलाच्या महापूजेसाठी अटकाव केला होता. यंदा याच भालकेंनी स्वतःच्या घरीच  मुख्यमंत्र्यांचा पाहुणचार केल्याने त्यांच्यासाठीही भाजपाने गळ टाकल्याची चर्चा सुरू झाली आहे. याशिवाय सिद्धराम म्हेत्रे, जयकुमार गोरे, कालिदास कोळंबकर, अब्दुल सत्तार तसेच नितेश राणे काँग्रेसमधून बाहेर पडण्याच्या बेतात आहेत. नितेश राणे स्वाभिमानी पक्षात जातील अशी चर्चा आहे, तर बाकीच्यांसाठी भाजपानेदरवाजे खुले केले आहेत. 

या आमदारांखेरीज आणखी काही आमदार फोडण्यासाठी भाजपाने प्रयत्न सुरू केले असून निवडणुकीच्या आधीच काँग्र्रेसला नामोहरम करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. या मोहीमेची जबाबदारी नुकतेच विरोधी पक्षनेतेपद सोडून भाजपात आलेले राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर सोपवण्यात आली आहे. शिवसेना आणि भाजपा यापैकी ज्या पक्षाकडे आपला मतदारसंघ असेल, त्या पक्षात जाण्यासाठी हे आमदार उत्सूक असल्याचे सांगन्यात येते. शिवसेनेच्या वाट्याला प्रामुख्याने राष्ट्रवादीकडील मतदारसंघ असल्याने राष्ट्रवादीमधील काही आमदारही शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे समजते. एकनाथ शिंदे यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे.  आपल्या संपर्कात काँग्र्रेसचे आणखी काही आमदार असल्याचे आज स्वतः विखे यांनीच सोलापूरात सांगितले.भाजप-शिवसेना युतीत आपला मतदारसंघ कुठल्या पक्षाच्या वाट्याला आहे. त्या पक्षात जाण्याकडे काँग्रेसच्या आमदारांचा कल आहे. लोकसभेतील पराभवाने खचलेल्या काँग्रेसला लवकरच हा मोठा धक्का बसणार आहे.

लोकसभा निवडणुकीतीप्रमाणेच विधानसभेतही भाजपची लाट राहील अशी खात्री पटल्याने काँग्रेस, राष्ट्रवादीकडून लढल्यास पराभवाची हमखास खात्री असलेले अनेकजण पुन्हा आमदार होण्यासाठी भाजपाच्या संपर्कात आहेत. असे अनेकजण माझ्या संपर्कात असून काही जण युतीत प्रवेशासाठी इच्छुक आहेत, मात्र याबद्दलचा अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील, असे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेले अनेक जण बाहेर पडण्याच्या विचारात असून आपण स्वतः त्यामुळेच भाजपात आलो, असे विखे यांनी सांगितले.  

दरम्यान, भाजपाने देशभर फोडाफोडीचे राजकारण सुरू केले आहे. तिकीट देतो आणि पैसेही देतो असे सांगून भाजपकडून आमदार फोडले जात असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे.