Thu, Apr 18, 2019 16:06होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई तुंबल्यास शिवसेना-भाजप जबाबदार!

मुंबई तुंबल्यास शिवसेना-भाजप जबाबदार!

Published On: May 18 2018 1:43AM | Last Updated: May 18 2018 1:09AMमुंबई : प्रतिनिधी 

मुंबई शहरात पावसाळ्यात तुंबणार्‍या पाण्यावरून सध्या शिवसेना-भाजपात चिखलफेक सुरू आहे. या वादात आता काँग्रेसनेही उडी घेतली आहे. शहरात पाणी तुंबल्यास राज्यात व पालिकेत सत्ता भोगणारे शिवसेना-भाजपा जबाबदार राहतील, असा आरोप काँग्रेसने केला आहे. त्यामुळे मुंबई शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. 

शहरात पाणी तुंबल्यास राज्य सरकारला जबाबदार राहील, असा आरोप महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला. याला प्रत्युत्तर म्हणून भाजपाने शहरात या अगोदर कधी पाणी तुंबले नव्हते का ? असा सवाल महापौरांना केला आहे. या वादात आता काँग्रेसने उडी घेतल्यामुळे येणार्‍या काही दिवसात मेट्रो रेल्वेचे काम व नालेसफाईवरून राजकीय वाद चांगलाच रंगणार आहे. मुंबईत 1997 पासून सलग 21 वर्षे शिवसेना-भाजपाची सत्ता आहे. 2017 मध्ये भाजपाने शिवसेनेशी मैत्री तोडली असली तरी, आतापर्यंत मुंबईत तुंबलेल्या पाण्याला भाजपाही तितकाच कारणीभूत आहे. नालेसफाईची कामे होत नसल्याचे शिवसेना-भाजपाच्या सत्तेत सिध्द झाले होते. त्यामुळे शिवसेनेवर आरोप करून, स्वत:ची कातडी वाचवण्याचा भाजपाची ही जुनीच खेळी असल्याचा आरोप पालिकेचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे. 

मुंबईत सुरू असलेल्या मेट्रोच्या कामामुळे पाणी तुंबणार, अशी भीती पालिका प्रशासनाने याअगोदर व्यक्त केली होती. पालिका आयुक्त अजोय मेहता यांनीही मेट्रोच्या कामाकडे विशेष लक्ष देण्याचे उपायुक्तांसह सहाय्यक आयुक्तांना आदेश दिले आहेत. त्यामुळे मेट्रोमुळे पाणी तुंबणार नाही, असा दावा भाजपाने करून नये. तर दुसरीकडे नालेसफाईचे कामही संथगतीने सुरू असून पावसाळ्यापूर्वी 100 टक्के नालेसफाई पूर्ण होणे शक्य नाही.