Fri, Apr 26, 2019 03:54होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भाजपवर स्ट्राईक; पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष?, खडसेंना राष्ट्रवादीची ऑफर!

भाजपवर स्ट्राईक; पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष?, खडसेंना राष्ट्रवादीची ऑफर!

Published On: Dec 28 2017 1:28AM | Last Updated: Dec 28 2017 1:28AM

बुकमार्क करा
मुंबई : उदय तानपाठक

काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी आता भाजपमध्ये नाराज असलेल्या नेत्यांना आपल्याकडे ओढण्यासाठी चढाओढ सुरू केली असून त्यासाठी अनेक आमिषांचा वापर केला जात आहे. आपले प्रदेशाध्यक्ष पददेखील अशा फुटीर नेत्याला देण्याची तयारी या दोन्ही पक्षांनी चालवली आहे. त्यामुळे नुकतेच भाजपच्या खासदारकीचा राजीनामा दिलेले नानाभाऊ पटोले यांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद दिले जाणार असून माजी महसूलमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनाही राष्ट्रवादीने प्रदेशाध्यक्षपद देऊ केल्याचे समजते.

खडसेंना आपल्या पक्षात ओढण्याचे प्रयत्न राष्ट्रवादीने चालवल्याचे वृत्त आज सर्वत्र चर्चेत होते. राष्ट्रवादीचे प्रवक्‍ते नवाब मलिक यांनी तर राजकारणात काहीही अशक्य नाही, असे सांगत या चर्चेला अप्रत्यक्ष दुजोरा दिला. 

पुण्यानजीकच्या एमआयडीसीमधील जमीन खरेदीप्रकरणी खडसे यांना मंत्रिपद गमवावे लागले होते. त्याच्या चौकशीसाठी आयोगही नेमला गेला. झोटिंग आयोगाने आपला अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर केला होता. या अहवालात खडसेंना क्‍लीन चिट दिली आहे. मात्र, आता हे प्रकरण न्यायालयात गेल्याने झोटिंग समितीच्या अहवालास आता काहीही अर्थ राहिला नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच हिवाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात सांगितले होते. मुख्यमंत्र्यांच्या या विधानामुळे खडसेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले जाणार काय, यावरच प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे.

याच काळात खडसे यांनीही आपल्याला काँग्रेस-राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी ऑफर दिल्याचे जाहीरपणे सांगताना आपण भाजप सोडून कुठेही जाणार नाही, असेही त्याचवेळी स्पष्ट केले होते. लवकरच जळगावात राष्ट्रवादीचा मेळावा होणार असून त्यात भाजपचे अनेक नेते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे नवाब मलिक यांनी आज सांगितले. या मेळाव्यास राष्ट्रवादीचे नेते अजित पवार उपस्थित राहणार आहेत. गेल्या निवडणुकीवेळी भाजप आणि शिवसेनेमध्ये गेलेले राज्यातील अनेक नेते घर वापसीच्या तयारीत असून अनेकांची  पक्षनेतृत्वाशी चर्चा सुरू आहे, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली. मात्र, खडसे स्वतः भाजप सोडणार की नाही, याबद्दल राजकारणात कुणी कायमचा शत्रू नसतो इतकेच मलिक म्हणाले. मात्र, राष्ट्रवादीची ही खेळी नवीन नाही, खडसे हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, ते भाजप सोडणार नाहीत, असा विश्‍वास भाजपचे प्रवक्‍ते माधव भांडारी यांनी व्यक्‍त केला.