Sun, May 26, 2019 16:39होमपेज › Mumbai-Thane-Raigad › काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीचे संकेत

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीचे संकेत

Published On: Jan 16 2018 2:13AM | Last Updated: Jan 16 2018 1:02AM

बुकमार्क करा
मुंबई : विशेष प्रतिनिधी

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात समविचारी पक्षांसह काँग्रेस आघाडी होण्याचे संकेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे यांनी दिले. राज्याच्या विकासासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उभारलेली सहकार चळवळ मोडीत काढण्यासाठी सरकारने उचललेली पावले, बेरोजगारीमुळे तरुणांमध्ये खदखदणारा असंतोष, महिलांवरील अत्याचारांमध्ये वाढ व सामाजिक शांतता राखण्यास हे सरकार अपयशी ठरल्यामुळे निवडणुकांसाठी दोन्ही काँग्रेस आता जवळ येत आहेत. महाराष्ट्राच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आघाडी हमखास होईल, असा  विश्‍वासही त्यांनी सोमवारी व्यक्त केला.
राष्ट्रवादी भवनमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तटकरे म्हणाले, राज्यात 1995 ते 1999 मध्ये युती सरकार होते. या सरकारने काढलेल्या कर्जाचे व्याज सत्तांतरानंतर काँग्रेस आघाडी सरकारने भरले. इतकेच नाहीतर राज्याची बिघडलेली आर्थिक स्थितीही काँग्रेस आघाडी सरकारने रुळावर आणली. 

गेल्या तीन वर्षांमध्ये युती सरकारने पाच लाख कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. विकासाच्या नावाखाली कर्ज घेतल्याचे स्पष्टीकरण हे सरकार करत असले तरी राज्यात कुठेही विकासकामे दिसत नाहीत. उलट राज्याची अर्थव्यवस्था ढासळल्याचे चित्र दिसू लागले आहे. त्यामुळे  युती सरकारने घेतलेले कर्ज कोणत्या कामांवर खर्च केले, याची जनतेला माहिती होण्यासाठी येत्या अर्थसंकल्पी अधिवेशनात कर्जाची श्‍वेतपत्रिका काढण्याची मागणी करणार असल्याचे ते म्हणाले. 

काँग्रेस व राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आमदार झालेल्यांचा या सरकारमध्ये जीव घुसमटत आहे. या सर्वांची लवकरच घरवापसी होणार आहे. भाजपा व शिवसेनेने सत्तेत येण्यापूर्वी दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता केली नाही. शेतकर्‍यांना 28 हजार कोटी रुपयांची कर्जमुक्ती दिल्याची घोषणा केली असली तरी कर्जमुक्ती दिलेल्या शेतकर्‍यांची यादी सरकार दडवत आहे. त्यामुळे  सरकारचा निषेध करण्यासाठी अर्थसंकल्पी अधिवेशनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने राज्यव्यापी आंदोलन करणार आहे.