काँग्रेस-राष्ट्रवादीचं जमलं!

Published On: Sep 17 2019 2:01AM | Last Updated: Sep 17 2019 1:57AM
Responsive image


मुंबई : विशेष प्रतिनिधी

पुढील महिन्यात होणार्‍या विधानसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने प्रत्येकी 125 जागांवर लढण्याचा निर्णय घेतला आहे, तर मित्रपक्षांसाठी 38 मतदार संघ सोडण्याचे दोन्ही काँग्रेसने मान्य केले आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी हा निर्णय जाहीर केला.  मित्र पक्षांना द्यावयाच्या 38 जागा आणि मतदार संघांच्या अदलाबदलीवर सोमवारी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी बैठक होणार होती. पण माजी मंत्री बी. जे. खताळ यांच्या निधनामुळे ती रात्री उशिरा झाली. मात्र, या बैठकीतही पूर्ण तोडगा निघाला नाही.

वंचितची भूमिका थेट भाजपा धार्जिणी असल्याचे दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता वंचितशिवाय अन्य समविचारी पक्षांशी आघाडी करण्यावर काँग्रेसने भर दिला आहे. समाजवादी पार्टी व बहुजन समाज पार्टीही स्वबळावर लढणार आहे. तर एमआयएमने आपले पत्ते खुले केले नाहीत. या तिन्ही पक्षांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला  जाईल. प्रा. जोगेंद्र कवाडे यांची पीपल्स रिपब्लिकन पार्टी, हितेंद्र ठाकूर यांची बहुजन विकास आघाडी, रिपब्लिकन पक्ष (गवई गट) तसेच शेतकरी कामगार पक्ष हे काँग्रेस आघाडीसोबत असतील. मात्र, हे सर्व पक्ष मिळून 38 जागा लढवण्याची शक्यता कमी असल्याने दोन्ही काँग्रेसच्या वाट्याला आणखी जागा येतील. त्यानुसार तयारी करण्याच्या सूचना  देण्यात आल्याचे समजते.