Tue, Apr 23, 2019 22:45होमपेज › Mumbai-Thane-Raigad › काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये आघाडीबाबत एकमत

काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये आघाडीबाबत एकमत

Published On: Feb 07 2018 1:57AM | Last Updated: Feb 07 2018 1:56AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

स्वबळावर निवडणुका लढल्यानंतर ठेच लागलेल्या दोन्ही काँग्रेसमध्ये आता आगामी निवडणुका एकत्र लढण्याबाबत एकमत झाले आहे. फेबु्रवारीच्या शेवटच्या आठवड्यात होणार्‍या राज्याच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात सत्ताधारी शिवसेना व भाजपाची कोंडी करून आपल्यात दिलजमाई झाल्याचा संदेश काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस देणार आहेत.
राज्यात आणि केंद्रात सत्तांतर झाल्यानंतर शेतकरी, मागासवर्गीय व इतर घटकांवर अन्याय होत आहेत. भाजपा पुन्हा सत्तेत आल्यास सर्वसामान्यांना न्याय मिळणार नाही, या भावनेने एकत्र येत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मंगळवारी विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी बैठक घेतली. 

अशोक चव्हाण म्हणाले, अधिवेशनात सरकारला घेरण्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये एकमत झाले आहे. मागील लोकसभा व विधानसभा निवडणुका आम्ही स्वबळावर लढविल्या होत्या. त्यामुळे दोन्ही पक्षाचे नुकसान झाले, शिवाय प्रतिगामी विचार असलेल्या पक्षांच्या हाती राज्य आणि केंद्राची सत्ता गेली. या अनुभवामुळे आता आगामी निवडणुकांमध्ये मतांचे विभाजन होणार नाही, यावर या बैठकीत एकमत झाले. केवळ लोकसभा आणि विधानसभा निवडणुकाच नाहीतर इतर सर्व प्रकारच्या निवडणुकांसाठी एकत्र येऊन भाजपा आणि शिवसेनेला सत्तेपासून रोखण्यावर भर देण्याबाबत दोन्ही काँग्रेसमध्ये सकारात्मक चर्चा झाली, अशी माहिती चव्हाण यांनी दिली. दरम्यान भारिप  बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आघाडीमध्ये सहभागी व्हावे, त्यांचे स्वागतच असेल असे आवाहन चव्हाण यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी आमच्यातील राजकीय दुरारा दूर झाल्याचे सांगितले.

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील रणनिती, राज्यातील पालघर, गोंदिया- भंडारा लोकसभा पोटनिवडणूक, विधान परिषदेची निवडणूक व सरकारविरोधात संयुक्त आंदोलन करण्याबाबत यावेळी चर्चा झाली. तर काही मुद्यांवर सोनिया गांधी व शरद पवार यांच्यात चर्चा होईल. आमच्यात आता गोडवा निर्माण झाल्याची मिश्किलीही तटकरे यांनी केली. विरोधी पक्षनेते विखे-पाटील, विधानपरिषद उपसभापती माणिकराव ठाकरे तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, जयंत पाटील, दिलीप वळसे - पाटील या बैठकीत सहभागी झाले होते.