होमपेज › Mumbai-Thane-Raigad › काँग्रेसला अंधारात ठेवून राजेंद्र गावित भाजपात

काँग्रेसला अंधारात ठेवून राजेंद्र गावित भाजपात

Published On: May 08 2018 4:59PM | Last Updated: May 08 2018 6:04PMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

काँग्रेस नेते आणि राज्याचे माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित यांनी आज (मंगळवार) भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. भाजप मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषद ही घोषणा करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे उपस्थित होते. आज सकाळपासूनच पालघरचे पोटनिवडणुकीतील काँग्रेसचे संभाव्य उमेदवार राजेंद्र गावित भाजपामध्ये जाणार असल्याची चर्चा रंगली होती. 

पालघरमध्ये ३५ -४० वर्ष मेहनत घेऊन चिंतामण वानगा यांनी पक्ष उभा केला. ती जागा भाजपकडेच राहीली पाहीजे. पालघरचे मोठे व्यक्तीमत्व भाजपमध्ये प्रवेश करत आहे, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी गावित यांच्या प्रवेशाची घोषणा केली. पालघरमध्ये भाजपचा विजय हीच चिंतामण वानगांना श्रद्धांजली असेल. पालघरची जागा भाजप हारली तर त्यांना वाईट वाटेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

भाजपाचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानं रिक्त झालेल्या पालघर लोकसभा मतदारसंघात २८ मे रोजी पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वनगा यांच्या कुटुंबीयांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. भाजपवर कुरघोडी करण्यासाठी सेनेने चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास यांना पक्षाकडून उमेदवारी दिली होती.