Sun, Mar 24, 2019 04:21होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई काँग्रेसचा ‘बॉस’!

मुंबई काँग्रेसचा ‘बॉस’!

Published On: Aug 23 2018 1:28AM | Last Updated: Aug 23 2018 1:01AMमुंबई : राजेश सावंत 

मुंबई काँग्रेसमध्ये तब्बल 22 वर्ष दबदबा असलेल्या दिवंगत काँग्रेस नेते मुरली देवरा यांना हटवून तत्कालिन काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनीया गांधी यांनी 2003 मध्ये मुंबई काँग्रेसला गुरूदास कामत हा नवा चेहरा दिला. कामत यांचा ईशान्य मुंबईचे तब्बल 20 वर्ष खासदार राहिल्यामुळे त्यांचा चेंबूर, मानखुर्द, घाटकोपर, विक्रोळी, कांजूर, भांडूप, मुलुंड आदी भागात चांगलाच दबदबा होता. पण मुंबईत देवरांनी निर्माण केलेले साम्राज्याच्या विरोधात उभे राहणे तितकेसे सोपे नव्हते. पण कामत यांनी विद्यार्थी दशेपासून राजकारण जवळून पाहिल्यामुळे त्यांनी मुंबई काँग्रेस अध्यक्ष पदावर आरूढ होताच, पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधून एक भक्कम फळी निर्माण केली. अवघ्या सहा महिन्यात मुंबई काँग्रेसमध्ये कामत गटाचे वर्चस्व वाढत गेले. कार्यकर्त्यांनी कामतांवर पुर्णपणे विश्वास टाकला. त्यानंतर कामत साहेब म्हणून ओळखल्या जाणार्‍या कामत यांची ‘बॉस’ अशी नवी ओळख निर्माण झाली. सामान्य कार्यकर्त्याही त्यांना ‘बॉस’ म्हणून ओळखू लागला.

चार वर्षाच्या मुंबई अध्यक्ष पदाच्या कार्यकाळात कामत यांनी, मुंबईत वर्चस्व असलेल्या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात स्वत:चे अस्तित्व निर्माण केले. संपूर्ण मुंबईत कामत यांनी कार्यकर्त्यांची भक्कम फळी बांधली. यातील काही हुशार कार्यकर्त्यांना मुंबई काँग्रेस कमिटीत स्थान दिले. यात अमरजितसिंह मनहास हे त्यांचे अत्यंत विश्वासू व कट्टर कार्यकर्ते होते. त्यानंतर कामत यांच्या गटात अनेक आमदार, नगरसेवक,ज्येष्ठ कार्यकर्ते सामिल झाले. त्यामुळे मुंबई काँग्रेसला नवी उभारी मिळाली.

मुंबई काँग्रेस अध्यक्ष पदाच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी स्वत:चा चांगलाच दबदबा निर्माण केला. महापालिका विरोधी अनेक आंदोलने, कार्यकर्ता मेळावा आदी कार्यक्रम घेतले. राजकारणात टिकायचे असेल तर, महिला सेल मजबूत करण्यावर त्यांनी विशेष भर दिला. त्यामुळे मुंबई काँग्रेसमध्ये महिलाराज दिसू लागले. कामत अध्यक्ष झाल्यानंतर पक्षांतर्गत असलेला वाद उफाळून आला होता. कामत-देवरा गटात उघडपणे वाद होऊ लागले. पण याकडे दुर्लक्ष करत कामत यांनी मुंबई काँग्रेस भक्कमपणे बांधली. 2004 मध्ये झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणूकीत काँग्रेसला चांगले यश मिळाले. त्यानंतर 2007 मध्ये कामत यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मुंबई महापालिका निवडणूकीत काँग्रेसला चांगले यश मिळाले. या निवडणूकीत मुंबई महापालिकेत काँग्रेसची सत्ता आली नाही. पण शिवसेना-भाजपा युतीला सत्तेसाठी नगरसेवकांची जमवाजमव करायला लावली. 

त्यानंतर 2008 मध्ये कामत यांनी मुंबई काँग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. पण त्यानंतर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष पदी विराजमान झालेले कृपाशंकर सिंह व प्रा. जनार्दन चांदुरकर यांनी कामत यांच्या नेतृत्वाखाली मुंबई काँग्रेसला उच्च स्थानी नेऊन ठेवले. त्यामुळे 2009 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणूकीत मुंबईतील सहा लोकसभा पैकी पाच लोकसभा मतदार संघात काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. यात स्वत: गुरुदास कामतही उत्तर-पश्‍चिम मतदार संघातून विजयी झाले. 

राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी असल्यामुळे ईशान्य मुंबई मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय पाटील विजयी झाले. मुंबई महापालिकेत शिवसेना-भाजपाचे सर्वाधिक नगरसेवक असतानाही मुंबईतील सहाही जागा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या ताब्यात ठेवल्या.2009 च्या  विधानसभा निवडणूकीत मुंबईतील 36 विधानसभा मतदार संघापैकी 18 मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार निवडून आले. यात कामत यांचा मोठा वाटा होता. या निवडणूका कामत यांच्या नेतृत्वाखाली लढण्यात आल्या होत्या.

दरम्यानच्या काळात कामत यांनी आपल्या काँग्रेसमधील सर्व पदांचा राजीनामा दिल्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते बिथरले होते. मुंबई काँग्रेस कार्यालयाबाहेर कामत गटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलने केली. याची दखल खुद्द सोनीया गांधी व राहुल गांधी यांनी घेतली. अखेर कामत यांना मुंबईत सक्रीय राहण्याचे आदेश दिले होते. पण याच काळात कामत यांचे खंद्दे समर्थकांनी शिवसेना-भाजपाचा रस्ता धरला होता. पण कामत ढगमगले नाहीत. त्यांनी आपले कार्य सुरूच ठेवले. केवळ आपल्या उत्तर-पश्‍चिम मुंबई मतदार संघातच नाही तर त्यांनी मुंबईतील काँग्रेसच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यकर्त्यांशी चर्चा केली. 

अंधेरी डी. एन. नगर येथील कार्यालयात उपस्थित राहून विभागातील नागरिकांच्याच नाही तर, कार्यकर्त्यांच्या समस्या समजून घेत, त्याचे निरासनही करत होते. त्यामुळे त्यांच्यावर प्रेम करणार्‍या कार्यकर्त्याचा आपल्या ‘बॉस’वर विश्वास होता. अन्य पक्षात गेलेले कार्यकर्ते आजही त्यांच्या वाढदिवसाला आठवनीने शुभेच्छा देतात. यावरून त्यांच्या कार्याचीच नाही तर जनसंपर्काचीही प्रचिती येते.