Sun, Apr 21, 2019 06:02होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महावितरणच्या कंत्राटी कामगारांना दिलासा

महावितरणच्या कंत्राटी कामगारांना दिलासा

Published On: Aug 07 2018 1:41AM | Last Updated: Aug 07 2018 1:30AMमुरबाड : प्रतिनिधी

राज्यातील महावितरण कंपनीतील सुमारे 2 हजार 285 कंत्राटी कामगारांना तूर्त कामावरून काढू नका, त्यांना जैसे थे स्थितीत ठेवा, असा आदेश उच्च न्यायालयाने महावितरणला दिला आहे. या कामगारांना कायम करण्यासंबंधी औद्योगिक न्यायालयात सुरू असलेला खटला सहा महिन्यांत निकाली काढण्याचे निर्देशही न्यायमूर्ती एम. सी. गुप्ते यांनी दिले. मुंबई उच्च न्यायालयात 2 ऑगस्ट रोजी याप्रकरणाची सुनावणी पार पडली.

महावितरण कंपनीत 2012 मध्ये विद्युत सहाय्यक पदासाठी 7 हजार पद भरतीची जाहिरात काढण्यात आली. त्यावेळी महावितरणमध्ये लाईन हेल्पर या पदावर सुमारे 10 हजार कंत्राटी कामगार कार्यरत होते. नवीन भरती झाल्यानंतर जालना व पुण्यातील कामगारांना महावितरणने कामावरून कमी केले होते, तर सोलापूर येथील कामगारांच्या बदल्या केल्या. महावितरणच्या या निर्णयाला महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघटनेने औद्योगिक न्यायालयात आवाहन दिले.

औद्योगिक न्यायालयानेही कामगार संघटनेची बाजू योग्य असल्याचा निर्वाळा दिला. मात्र त्यांना सेवेत कायम ठेवण्यासंदर्भात कोणतेही निर्देश दिले नसल्याने कामगार संघटनेने सन 2013 मध्ये उच्च न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर 2 ऑगस्ट रोजी न्यायमूर्ती एम. सी. गुप्ते यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. 

यावेळी न्यायालयाने कंत्राटी कामगारांना कामावरून काढू नका व जैसे थे स्थिती ठेवा, असा आदेश देताना औद्योगिक न्यायालयाला 6 महिन्यांत खटला निकालात काढण्याचे आदेश दिले आहेत. तोपर्यंत कामगारांचे वेतन सुरू ठेवण्याचे निर्देश दिल्याने कामगारांना दिलासा मिळाला आहे. 

राज्यातील ग्रामीण भागातील विशेषतः कल्याण, शहापूर, मुरबाड येथील कंत्राटी कामगारांनी या निर्णयाचे स्वागत केल्याची माहिती मुरबाड येथील कंत्राटी कामगार बाळू शिंदे यांनी दिली आहे.