Thu, Jul 18, 2019 02:18होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गौरी लंकेश यांचे मारेकरी सापडतात; पानसरेंचे का नाही?

लंकेश यांचे मारेकरी सापडतात; पानसरेंचे का नाही?

Published On: Jun 29 2018 1:36AM | Last Updated: Jun 29 2018 1:36AMमुंबई : प्रतिनिधी

गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी आरोपींना कर्नाटक पोलीस महाराष्ट्रातून  बेड्या ठोकून घेऊन जातात. परंतु,  महाराष्ट्रात घडणार्‍या गुन्ह्यांबद्दल आमच्या तपास यंत्रणांना काहीच कसे हाती लागत नाही, अशी खंत उच्च न्यायालयाने व्यक्‍त करून डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या  मारेकर्‍यांच्या हातात बेड्या का ठोकल्या जात नाहीत? सातत्याने अपयश का येते, असा संतप्त सवाल न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठाने उपस्थित करून तपास यंत्रणांना चांगलेच धारेवर धरले.

तपास यंत्रणा या दोन्ही प्रकरणात पूर्णपणे अपयशी ठरली आहे, असे स्पष्ट मत व्यक्‍त करून न्यायालयाने पुढील सुनावणीला सीबीआयचे दिल्लीतील सहसंचालक आणि पानसरे प्रकरणात महाराष्ट्राचे गृहसचिव यांना 12 जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले. गोविंद पानसरे आणि नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याकांडाची स्वतंत्र यंत्रणांमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी करणार्‍या विविध याचिका उच्च न्यायालयात दाखल आहेत़  या याचिकांवर गुरुवारी न्यायमूर्ती एस. सी. धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर गुरुवारी सुनावणी झाली. यावेळी तपास यंत्रेणेने सादर केलेल्या अहवालावर  न्यायालयाने नाराजी व्यक्‍त केली. वरिष्ठ अधिकार्‍यांना न्यायालयात  बोलावल्याशिवाय  आता आमच्याकडे पर्याय नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे.महाराष्ट्रासारख्या राज्यात अशा घटना घडतात आणि त्याच्या तपासात काही निष्पन्‍न होत नाही, हे या पुरोगामी राज्याला शोभणारे नाही. तपास यंत्रणांमध्ये कोणताही समन्वय नाही, हे उघड झाले आहे. तपासात प्रगती दिसून येत नाही.
- मुंबई उच्च न्यायालय