होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बजेटमध्ये सातही मेट्रो सुसाट

बजेटमध्ये सातही मेट्रो सुसाट

Published On: Mar 23 2018 1:58AM | Last Updated: Mar 23 2018 1:21AMमुंबई : प्रतिनिधी 

मेट्रोच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाची वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या हेतूने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) यंदाचा अर्थसंकल्प जाहीर केला आहे. गुरूवारी एमएमआरडीएने जाहीर केलेल्या 2018-19 सालच्या 12 हजार 157 कोटींच्या अर्थसंकल्पामध्ये 4 हजार 700 कोटींची भरीव तरतूद फक्त सात मेट्रो प्रकल्पांसाठी केली आहे. तसेच मुंबई ट्रांस हार्बर लिंक (एमटीएचएल) प्रकल्पासाठी 2 हजार 100 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 

एमएमआरडीएचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या एमएमआरडीएच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पाला मंजुरी दिलीे. सात मेट्रो प्रकल्पांसाठी 4 हजार 700 कोटींची, एमटीएचएलसाठी (शिवडी- न्हावाशेवा सागरी मार्ग) 2 हजार 100 कोटींच्या अर्थसंकल्पीय तरतुदीमुळे या प्रकल्पास चालना मिळणार आहे. या प्रकल्पामुळे नवी मुंबई, आंतर राष्ट्रीय विमानतळाकडे जाण्यासाठी थेट मार्ग उपलब्ध होणार असून पुणे एक्सप्रेस वे आणि पुढे दक्षिण भारताकडे जाण्यासाठी देखील प्रकल्प उपयोगी ठरणार आहे. 

जलस्त्रोत विकासासाठी 581 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. सूर्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या कामास सुरूवात करण्यात आली असून याद्वारे मीरा-भाईंदर व वसई- विरार महानगर पालिका तसेच काही भाडे तत्वावरील घरे योजना आणि महानगर प्रदेशातील पश्‍चिम उपप्रादेशिक नगरातील गावांसाठी मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा करता येणार आहे. सूर्या धरणातून पाणी घेऊन त्यावर सूर्या नगर येथे प्रक्रिया करण्यात येईल. या प्रकल्पाची अंदाजित रक्कम 1 हजार 611 कोटी इतकी आहे. 

यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये डॉ.आंबेडकर स्मारकासाठी 150 कोटींची तरतुद करण्यात आली आहे. आमचा वचनपूर्तींवर विश्‍वास आहे. डॉ.आंबेडकर  यांच्या विचारांचे पालन सर्वांनी करावे, हा आमचा प्रयत्न आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. 

मुंबई महानगर प्रदेश आणि रस्त्यांचे जाळे विकसीत करण्याकरता अर्थसंकल्पात 1 हजार 290 कोटी रूपयांची तरतुद करण्यात आलेली आहे. या प्रदेशाला मुंबई शहर आणि आसपासच्या परिसराबरोबर जोडण्याकरता उत्तम जोडणी उपलब्ध करून देण्यासाठी उड्डाणपूल, खाडी, पूल आणि रस्त्यांचे जाळे यांच्या विकासासाठी लक्षणीय तरतूद करण्यात आली आहे. 

Tags : Mumbai, Mumbai news, Comprehensive, provision, seven Metro projects,