Sat, Jul 20, 2019 10:40होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डॉ.आंबेडकर स्मारकाचे काम ३ वर्षांत पूर्ण

डॉ.आंबेडकर स्मारकाचे काम ३ वर्षांत पूर्ण

Published On: Mar 20 2018 2:13AM | Last Updated: Mar 20 2018 1:58AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

शापूरजी पालनजी या बांधकाम कंपनीला इंदू मिलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारणीचे काम देण्यात आले आहे. या कंपनीची 709 कोटी रुपयांची निविदा मंजूर करण्यात आली असून 106 मीटर उंचीचा बाबासाहेबांचा पुतळा असलेले हे स्मारक येत्या तीन वर्षांमध्ये उभे राहणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधान परिषदेत दिली. विधान परिषद सदस्य शरद रणपिसे, प्रकाश गजभिये, भाई गिरकर, प्रा. जनार्दन चांदूरकर आदींनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देतांना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. 

स्मारक उभारण्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. 763 कोटी रुपयांच्या रकमेला सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून यापेक्षा जास्त निधी लागला तरी सरकार मागेपुढे पाहणार नाही. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांना इंदू मिलमध्ये नेऊन कामे दाखविण्यात येतील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. 

स्मारकाच्या संदर्भात जागा हस्तांतरणाबाबत औपचारिक बाबींची पूर्तता, सीआरझेड अधिसूचनेच्या अनुषंगाने मान्यता, मंजूर विकास योजनेमध्ये फेरबदल या वैधानिक बाबींची पूर्तता करण्यासह, स्मारकाच्या आराखड्याबाबत संबंधित व्यक्ती आणि संस्थांची मते विचारात घेणे आवश्यक होते. तसेच निविदा प्रक्रियेला पहिल्या प्रयत्नात प्रतिसाद न मिळाल्यामुळे या स्मारकाचे प्रत्यक्ष काम सुरू होण्यासाठी काहीसा कालावधी लागला. या स्मारकाच्या बांधकामासाठी पहिल्यांदा प्राधिकरणाने 600 कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली होती. मात्र या स्मारकासाठी 300 वर्षे टिकणार्‍या स्टीलचा वापर करण्याचा निर्णय घेतल्यामुळे या कामासाठी 763 कोटी रुपयांच्या रकमेला सुधारित मान्यता दिल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

tags : Dr. Ambedkar memorial, work, Complete, in 3 years, Chief Minister Devendra Fadnavis, Information,