Tue, Mar 19, 2019 09:26होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अर्थसंकल्पीय तरतूद असलेले रेल्वे प्रकल्प तातडीने  पूर्ण करा

अर्थसंकल्पीय तरतूद असलेले रेल्वे प्रकल्प तातडीने  पूर्ण करा

Published On: Aug 24 2018 12:51AM | Last Updated: Aug 24 2018 12:50AMमुंबई : प्रतिनिधी

ज्या रेल्वे प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे, ते प्रकल्प  तातडीने पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी दिले.  रेल्वेमंत्री पियूष गोयल हेही यावेळी उपस्थित होते . यामध्ये सीएसएमटी ते पनवेल व चर्चगेट ते विरार कॉरिडॉर मार्गाच्या टप्प्यांचा  तसेच पुणे- मिरज- लोणावळा, अहमदनगर- बीड-परळी वैजनाथ  या मार्गांचा समावेश आहे. 

राज्यातील मंजूर असलेले  व निधी उपलब्ध करून देण्यात आलेले रेल्वे प्रकल्प व त्याच्या प्रगतीच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी सह्याद्री अतिथिगृहात एक बैठक आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते.  

राज्यातील अनेक रेल्वे प्रकल्पांना रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. रेल्वे लाईन टाकण्यासाठी व संपूर्ण प्रकल्प राबविण्यासाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेला गती देण्याची गरज आहे. त्यासाठी सिडको,  मुंबई विकास प्राधिकरण व मुंबई रेल्वे विकास महामंडळाने एकत्र येऊन भूसंपादनाचा प्रश्‍न निकाली काढण्याचे  आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले. 

राज्यातील मंजूर प्रकल्पांसाठी रेल्वे लाईन टाकण्याचे मोठे काम आहे. काही ठिकाणी दुसरी व तिसरी रेल्वे लाईन टाकण्याचे नियोजन आहे. हे काम  पूर्ण  होण्यासाठी भूसंपादनाला गती द्यावी लागेल. सीएसएमटी ते पनवेल व चर्चगेट विरार कॉरिडॉर मार्ग, विविध रेल्वे स्थानकातील इलेव्हेटेड कॉरिडॉरची कामे , रेल्वे मार्गावरील पूल, हायस्पीड रेल्वे, रेल्वेस्थानकातील सोयीसुविधा, इन्टीग्रेटेड तिकीट व्यवस्था  सुरू करण्याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली. 

कामे वेळेत मार्गी लावा

मुंबई रेल्वे विकास महामंडळाने यावेळी त्यांच्या सुरू असलेल्या प्रकल्पाबाबतचे सादरीकरण केले. मुंबई शहर व परिसरात रेल्वे प्रकल्पांची जी कामे सुरू आहेत, त्याची माहिती देण्यात आली. त्याच्या सद्यस्थितीची माहिती घेत गोयल यांनी चालू आर्थिक वर्षासाठी ज्या प्रकल्पांकरिता अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे, त्या प्रकल्पांची कामे नियोजित वेळेत पूर्ण करण्याचे आदेशही यावेळी दिले. 

यावेळी मुख्य सचिव दिनेशकुमार जैन, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव यू. पी. एस. मदान, अप्पर मुख्य  सचिव प्रवीण परदेशी, महापालिका आयुक्त अजोय मेहता तसेच रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.