Fri, Aug 23, 2019 21:49होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सहा महिन्यांत प्लास्टिकवर पूर्ण बंदी

सहा महिन्यांत प्लास्टिकवर पूर्ण बंदी

Published On: Dec 03 2017 1:06AM | Last Updated: Dec 03 2017 12:33AM

बुकमार्क करा

मुंबई : 

येत्या सहा महिन्यांत प्लास्टिकवर पूर्ण बंदी घालण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ही बंदी आणताना पर्यायी व्यवस्थाही केली जाणार असल्याचे ते म्हणाले. 
राष्ट्रीय हरित लवाद व पर्यावरण विभागाच्या वतीने एनसीपीएमध्ये आयोजित केलेल्या राष्ट्रीय पर्यावरण परिषदेच्या  उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री बोलत होते. 

स्वच्छ भारत अभियानात महाराष्ट्र  अग्रेसर असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, देशातील अनेक नद्या प्रदूषित आहेत. महाराष्ट्रात मात्र नदी स्वच्छता मोहीत हाती घेतली असून जलयुक्त शिवार योजनेमुळे 2 वर्षांत 11 हजार गावे पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाली आहेत. 

मुंबईत सुरू असलेल्या मेट्रोच्या  कामाचा उल्लेख करून मुख्यमंत्री म्हणाले की, काही नागरिकांनी याबाबत न्यायालयात याचिका दाखल केल्यामुळे कामाची गती मंदावली आहे. हे काम दिवसा करावे, रात्री करू नये, धुळीचा मुद्दा आहे त्याचप्रमाणे इमारतींना तडे जात असल्याची कारणे दिली जात आहेत. मात्र जनतेने विकासाला साथ दिली पाहिजे. मेट्रोमुळे विकासाला गती येणार असून काम रखडले तर कोट्यवधी रुपयांची हानी होणार आहे. 

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांनी प्रदूषण हटाव ही सामाजिक चळवळ व्हावी अशा भावना व्यक्त केल्या. शहरातील कचरा उचलण्याचे योग्य नियोजन व्हावे,प्लास्टिक वस्तू व कॅरीबॅग वापरावर बंदी हवी  असे सांगत त्यांनी ध्वनी प्रदुषण, जल प्रदुषण व कचर्‍याची विल्हेवाट यासाठीच्या तक्रारी या  ऑनलाईन स्विकाराव्यात अशी सुचना केली. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमुर्ती मंजुळा चेल्लूर यांनी विकास होताना पर्यावरणाची हानी होणार नाही याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. मुख्य सचिव सुमित मल्लिक यांनी ग्लोबल वॉर्मिंगचा धोका असल्याचे सांगुन पर्यावरणाचे संतुलन कायम राखण्यासाठी प्रत्येक व्यक्तीचा सहभाग मोलाचा असल्याचे सांगितले. 

राष्ट्रीय हरित लवादाचे अध्यक्ष न्यायमुर्ती स्वतंत्रकुमार यांनी मानवी जीवनावर ज्याप्रकारे परिणाम होत  आहे ते पहाता याबाबत जागृत रहाण्याची गरज प्रतिपादन केली. यानिमीत्य काढण्यात आलेल्या स्मरणिकेचे प्रकाशनही करण्यात आले. गुजरात प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष  अरविंद अग्रवाल यांनी आभार मानले. राज्यमंत्री दिपक केसरकर , पर्यावरण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सतिश गवई हे यावेळी उपस्थीत होते.