Thu, Jul 18, 2019 21:40होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लाचखोर घरतच्या निलंबनावर शिक्‍कामोर्तब

लाचखोर घरतच्या निलंबनावर शिक्‍कामोर्तब

Published On: Jun 20 2018 2:01AM | Last Updated: Jun 20 2018 1:30AMकल्याण : वार्ताहर

आठ लाखांची लाच स्वीकारताना केडीएमसी अतिरिक्‍त आयुक्‍त संजय घरत, स्वीयसचिव ललित आमरे आणि वरिष्ठ लिपिक भूषण पाटील यांना ठाणे एसीबीने रंगेहाथ अटक केली होती. घरत आणि आमरे यांना आयुक्‍त  गोविंद बोडके यांनी महापालिका सेवेतून अखेर निलंबित केले असून, पाटील याच्या विरोधात निलंबनाची कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात आले. या तिघांना एसीबीने मंगळवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना चौदा दिवसांची 2 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. या तिघांची आधारवाडी कारागृहात रवानगी करण्यात आली. 

13 जूनला केडीएमसीच्या कल्याण मुख्यालयात अवैध इमारतीच्या बांधकामावर कारवाई टाळण्यास संजय घरत, ललित आमरे व भूषण पाटील या तिघांना आठ लाखांची लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहाथ अटक केली होती. मंगळवारी एसीबीने महापालिका आयुक्‍तांना अहवाल सादर केल्यानंतर त्यांनी संजय घरत व अन्य दोघांचे निलंबन कोणत्या पालिका अधिनियमना अन्वये करता येईल, याची तपासणी केली. त्यानुसार, संजय घरत व ललित आमरे या दोघांचे निलंबन 14 जूनपासून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तिसरा आरोपी भूषण पाटील यांच्या विरोधात निलंबनाची कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात आले. 

तिघांना चौकशीसाठी गुरुवारी व त्यानंतर रविवारी पोलीस कोठडीची मागणी पोलिसांनी केली होती. मंगळवारी जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी. एस. हातरोठे यांनी तिघांना 2 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावताच या सर्वांनी जामीनासाठी अर्ज सादर केला असता, त्यावर बुधवारी (20 जून) न्यायालयात सुनावणी होणार आहे.