Fri, Jul 19, 2019 00:52होमपेज › Mumbai-Thane-Raigad › खडसेंच्या मूषकास्त्राने भाजपमध्ये अस्वस्थता

खडसेंच्या मूषकास्त्राने भाजपमध्ये अस्वस्थता

Published On: Mar 25 2018 2:17AM | Last Updated: Mar 25 2018 2:05AMमुंबई : उदय तानपाठक

मंत्रालयातील उंदीरघोटाळा एकनाथ खडसे यांनी विधानसभेत मांडल्यानंतर आता भाजपलाच अंतर्गत संघर्षाने कुरतडल्याचा हा परिणाम असेल काय, अशी शंका घेतली जाते आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर हे मूषकास्त्र सोडले गेले नसेल ना, अशी चर्चा सुरू झाली आहे. खडसे यांनी एकामागोमाग सरकारवर टीकास्त्र सोडायला सुरुवात केल्याने भाजपमध्ये आणि मंत्रिमंडळात अस्वस्थता आहे.

खडसे यांनी मंत्रालयातील उंदीर मारण्यासाठी झालेला अफाट खर्च आणि त्यासाठी निघालेल्या निविदा याबद्दल सभागृहातच सवाल केल्यावर एकच खळबळ उडाली आहे. आधी हा विषय मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या सामान्य प्रशासन विभागाकडे असल्याचे सांगत थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावर खडसे यांनी वार केल्याचे चित्र उभे राहिले होते. मात्र, प्रत्यक्षात सार्वजनिक बांधकाम विभागाने हे कंत्राट दिल्याचे उजेडात आल्याने त्या खात्याचे मंत्री चंद्रकांत पाटील हेच खडसे यांचे लक्ष्य असल्याची चर्चा आहे.

Tags : mumbai news, Commentary on Eknath Khadse Government

संपूर्ण अधिवेशनात विरोधी पक्षांची कामगिरी प्रभावहीन झाल्याने आता एकनाथ खडसे हेच विरोधी पक्षनेते किंवा पक्ष विरोधी नेते म्हणून काम करू लागल्याचे दिसत आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यापेक्षा खडसे यांनाच अधिक प्रसिद्धी मिळत आहे.

खडसेंना कानपिचक्या

दरम्यान, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज खडसेंच्या या आरोपसत्राबद्दल जाहीर नाराजी व्यक्‍त केली. मूषकसंहारात झालेल्या कथित घोटाळ्याचा आरोप तसेच खडसे यांच्या अन्य वक्‍तव्यांबद्दल शिर्डी येथे प्रसारमाध्यमांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना विचारले तेव्हा, एखाद्या गोष्टीचा चुकीचा अर्थ काढणार्‍यांना साईबाबा सद्बुद्धी देवो, इतकेच ते म्हणाले. आधीच जनतेचा व्यवस्थेवरचा विश्‍वास कमी झाला आहे, अशा बेजबाबदार विधानांनी तो आणखी कमी होईल, अशा शब्दांत मुनगंटीवार यांनी खडसे यांचे नाव न घेता कानउघाडणी केली आहे.

सेनेची टीका

शिवसेनेने मात्र यावरून पुन्हा एकदा भाजपवर शब्दांचे बाण सोडले आहेत. खडसे यांनी हा घोटाळा उघड करण्यामागच्या हेतूबद्दलच शंका घेत उद्धव ठाकरे यांनी, सरकारलाच धारेवर धरले आहे. मंत्रालय हे उंदरालय झाले असून, हे मुक्‍त ते मुक्‍त करण्याची भाषा करणार्‍यांच्या राज्यात मंत्रालयच उंदीरयुक्‍त झाल्याची टीका ठाकरे यांनी केली आहे. उंदीरयुक्‍त मंत्रालय उंदीरमुक्‍त करा अन्यथा जनता बाहेर पिंजरा लावून बसलेली आहे, असा इशाराही उद्धव यांनी दिला आहे.