Mon, Apr 22, 2019 21:50होमपेज › Mumbai-Thane-Raigad › प्लास्टिकबंदी प्रदर्शनात एकत्र येण्यास मुख्यमंत्री व ठाकरे यांचा नकार !

प्लास्टिकबंदी प्रदर्शनात एकत्र येण्यास मुख्यमंत्री व ठाकरे यांचा नकार !

Published On: Jun 22 2018 2:42AM | Last Updated: Jun 22 2018 2:07AMमुंबई : राजेश सावंत

मातोश्रीत जाऊन भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी घेतलेल्या उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर शिवसेना-भाजपातील संबंध सुधारतील असे वाटत होते. पण शिवसेना शिबिरात ठाकरे यांनी महाराष्ट्रात शिवसेनेचा भगवा फडकणारच अशी दिलेली आरोळी..  त्यानंतर महापालिकेने आयोजित केलेल्या तीन दिवसीय प्लास्टिकबंदी कार्यशाळेच्या उद्घाटनाला मुख्यमंत्र्यांसह ठाकरे यांनी एकत्र येण्यास दिलेला नकार, त्यामुळे शिवसेना-भाजपातील दरी अजूनच वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.

केंद्र व राज्यात भाजपा-शिवसेना सत्तेत असली तरी, भाजपा-शिवसेनेत आलबेल नसल्याचे अनेकदा दिसून आले आहे. राज्यात शिवसेनेची वाढलेली ताकद लक्षात येताच भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीत जाऊन घेतलेल्या भेटीमुळे भाजपा-शिवसेना एकत्र येईल, असे वाटत होते. पण शिवसेनेच्या महाशिबिरात ठाकरे यांनी महाराष्ट्रात भगवा फडकणार असे ठणकावून सांगत युतीचा मार्ग बंद केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना-भाजपात खटके उडण्याची शक्यता आहे. भाजपा-शिवसेनेत वाद असले तरी, उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील मैत्रीमुळे अजूनपर्यंत राज्यातील सत्ता टिकून आहे.

गेल्या चार वर्षात महापालिकेच्या जाहीर कार्यक्रमात ठाकरे व मुख्यमंत्री अनेकदा एका व्यासपीठावर आले होते. पालिका सभागृहातील प्रबोधनकार ठाकरे यांच्या तैलचित्राच्या अनावरणासाठी मुख्यमंत्री अवर्जुन उपस्थित होते. पण शहा-ठाकरे भेटीनंतर शिवसेनेच्या महामेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची एकहाती सत्ता येण्याच्या केलेल्या गर्जनेमुळे भाजपाचे नेतेच नाही तर, मुख्यमंत्र्यांनीही ठाकरे यांची साथ सोडल्याचे बोलले जात आहे.