Tue, Apr 23, 2019 20:22होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विद्यापीठात पुढील वर्षी महाविद्यालये वाढणार

विद्यापीठात पुढील वर्षी महाविद्यालये वाढणार

Published On: Dec 06 2017 1:44AM | Last Updated: Dec 06 2017 12:55AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

गेल्या सप्टेंबरमध्ये नव्याने 36 महाविद्यालयांचे प्रस्ताव मुंबई विद्यापीठाने उच्च तंत्र शिक्षण विभागाकडे पाठवल्यानंतर आता पुन्हा एकदा नवीन महाविद्यालयांच्या मंजूरीसाठी प्रस्तावाचे आवाहन विद्यापीठाने केले आहे. त्यामुळे पुढीलवर्षी मुंबई विद्यापीठात आणखी महाविद्यालये वाढण्याची शक्यता आहे.

मुंबई विद्यापीठाने यंदाच्या बृहतआराखड्यात तब्बल 45 नवीन महाविद्यालयांना स्थान दिले असून त्यात पारंपारिक  कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेसाठी 11, सात रात्र आणि 3 महिला आणि विधी 8 अशा महाविद्यालयांचा समावेश करत अर्ज मागितले होते. यासाठी सप्टेंबर अखेरीस विद्यापीठाकडे एकूण 47 महाविद्यालयाचे प्रस्ताव दाखल झाले होते. त्यातील 36 महाविद्यालयाचे प्रस्ताव 29 नोव्हेंबरला रोजी विद्यापीठाने शासनाकडे पाठविले आहेत. उच्च व तंत्र शिक्षण विभागाची मान्यता मिळाल्यानंतर हा विद्यापीठाला 2018-19 या शैक्षणिक वर्षाकरिता मान्यता मिळणार आहे. त्यानंतर आता 2018- 2019 साठी नवीन महाविद्यालये सुरू करण्यासाठीची ही सुधारित जाहिरात विद्यापीठाने दिली आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 15 डिसेंबर आहे.

2018 - 19 या वर्षाकरिता विद्यापीठाच्या बृहत आराखड्यास महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण व विकास आयोगाच्या मंजूरीनुसार ऑनलाइन पद्धतीने प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. 

बृहतआराखड्यांत विद्यापीठाने भौगोलिक परिस्थिती, त्या परिसराची गरज, संशोधनविषयक धोरण, कौशल्य विकास, शहरी, ग्रामीण आणि आदिवासी भागासाठी विकासाचे निकष पाहूनच उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे सादर केले आहेत. या बृहतआराखड्यास मंजूरी मिळाल्यानंतर महाविद्यालयांसाठी आलेले प्रस्ताव पुन्हा मंजूरीसाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे सादर केल्यानंतर पुढील शैक्षणिक वर्षापासूनही ही महाविद्यालये सुरु होणार आहेत.