Sat, Apr 20, 2019 16:16होमपेज › Mumbai-Thane-Raigad › एसी लोकलला थंडगार प्रतिसाद

एसी लोकलला थंडगार प्रतिसाद

Published On: Jan 15 2018 1:39AM | Last Updated: Jan 15 2018 1:20AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

खच्चून भरलेल्या लोकल ही मुंबई लोकलची ओळख आहे. एकीकडे मुंबईच्या तीनही मार्गावरील लोकल  नेहमीच  गर्दीने तुडूंब भरलेल्या असताना विरार आणि बोरिवलीहून सुटणार्‍या वातानुकूलित लोकल मात्र रिकाम्याच धावताना दिसत आहेत. वाजतगाजत सुरू झालेल्या देशातील पहिल्या वातानुकूलित लोकल सेवेला मुंबईकरांचा थंडीच्या काळात थंडच प्रतिसाद मिळाला आहे. 

चर्चगेटहून विरार-बोरिवलीला जाणार्‍या गाड्या मात्र पूर्णता रिकाम्याच धावत आहेत. 25 डिसेंबरला चर्चगेट ते बोरिवली आणि 1 जानेवारीला विरारपर्यंत विस्तार केलेल्या वातानुकूलित लोकलमध्ये प्रवाशांची संख्या वाढण्याचा दावा फोल ठरला असतानाच आता अजून 210 एसी लोकल खरेदी करण्याची रेल्वेने तयारी सुरू केली आहे. रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्या आगामी मुंबई दौर्‍याच्यावेळी एसी लोकल खरेदीचा प्रस्ताव त्यांच्यासमोर मांडण्यात येणार आहे. 

बोरिवलीहून चर्चगेटसाठी जाणार्‍या वातानुकूलित लोकलमध्ये प्रवाशांची संख्या बरी म्हणण्याइतपत चित्र आहे. मात्र विरार ते बोरिवलीपर्यंत ही संख्या अगदी तुरळक आहे. वसई, भाईंदर स्थानकांवर थांबा असला तरीही दुपारच्या वेळेस तिथून चुकूनमाकून एखादा प्रवासी लोकलमध्ये शिरत असावा, अशी स्थिती आहे. सध्या एसी लोकलच्या दिवसाला फक्त बारा फेर्‍या होतात तर शनिवार व रविवार ही लोकल धावत नाही. त्यामुळे आता या लोकलच्या फेर्‍या वाढविण्यासाठी रेल्वे प्रशासनाने आणखी लोकल खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे पुढील काही दिवसात चांगला प्रतिसाद मिळेल असे चित्र आहे.

एसी लोकल खरेदी व्यतिरिक्त मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्या आगामी मुंबई दौर्‍याच्यावेळी रेल्वेतील सोयी- सुविधा व विकासासाठी 44हजार कोटींचा प्रस्ताव मांडणार आहे. त्यात रेल्वे वेळापत्रकानुसार धावाव्यात त्यासाठी सिग्नल यंत्रणेत सुधारणा, वॅगनची खरेदी, बोरिवली ते विरारदरम्यान पाचवा व सहावा ट्रॅक बांधणे, हार्बर मार्गाचा बोरिवली पर्यंत विस्तार, कल्याण- बदलापूर आणि कल्याण- आसनगाव या दोन्ही मार्गांवरील तिसर्‍या-चौथ्या ट्रॅकचे काम, पनवेल ते सीएसएमटी आणि पनवेल ते विरारदम्यान कॉरिडोर बांधणे अशा कामांसाठी हा 44 हजार कोटींचा निधी वापरला जाणार आहे.