Sun, Apr 21, 2019 01:50होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कुलाब्याची झोपडपट्टी होणार ‘स्मार्टसिटी’

कुलाब्याची झोपडपट्टी होणार ‘स्मार्टसिटी’

Published On: Apr 18 2018 2:01AM | Last Updated: Apr 18 2018 1:35AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

धारावीपाठोपाठ मोठे क्षेत्रफळ, जागेचे महत्त्व आणि दराबाबत काहीशी ‘कडक’ असलेली कुलाबा येथील झोपडपट्टी लवकरच कात टाकणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून लहान-लहान झोपड्या, मासेमारांच्या होड्या आणि जाळ्यांनी वेढलेली ही बकाल वसाहत आता मोकळा श्‍वास घेणार असून त्याठिकाणी गगनचुंबी इमारती उभ्या राहणार आहेत. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, गणेशमूर्ती नगर या नावाने ही वसाहत ओळखली जाते. सरकारची मालकी असलेल्या सी. एस. क्र. 599 आणि 658 या भूखंडावर ही वसाहत आहे. सुमारे 33 एकरचा हा भूखंड असून तेथे सात हजार झोपड्या आहेत. निळाभोर समुद्रकिनारा, मंत्रालय, आमदार निवास, विधान भवन, विविध बँकांची मुख्यालये इत्यादी महत्त्वाची कार्यालये हाकेच्या अंतरावर असल्यामुळे हा जागेला अत्यंत महत्त्व आहे. मात्र गरिबांची वसाहत अशा शब्दांत हेटाळणी होणारी ही वसाहत एसआरएच्या माध्यमातून आता आपले दैन्य झटकणार आहे.

शापूरजी पालनजी ही प्रसिद्ध बांधकाम कंपनी या झोपडपट्टीचा एसआरएच्या माध्यमातून विकास करणार आहे. येथील पाच हजार झोपडीधारकांना प्रत्येकी 25 चौ.मी. कारपेट एरिया मिळणार आहे. राज्यात 1990 मध्ये युती सरकार आल्यानंतर एसआरएला सुरुवात झाली. तेव्हापासून कुलाब्याचा झोपडपट्टीचा विकासाचा मुद्दा चर्चेत होता. पण विकासकांमधील स्पर्धा, रहिवाशांच्या आवडीनिवडी, न्यायालयान लढा व अन्य काही तांत्रिक कारणांमुळे तेथे एसआरए होऊ शकली नाही. अखेरीस मुंबई हायकोर्ट व सुप्रीम कोर्टाने प्रतिपक्षी विकासकांना असमर्थ ठरवून बांधकाम व्यावसायिक  शापूरजी पालनजी यांच्या बाजूने निर्णय दिला आणि विकासाच्या मार्गातील अडथळे दूर झाले.

येत्या काही महिन्यांमध्ये येथे विकासकामे सुरू करण्यात येणार आहेत. जल, रस्ते, मेट्रो व हवाई वाहतुकीशी जोडली जाणारी मुंबईतील ही पहिली स्मार्ट वसाहत ठरण्याची शक्यता आहे.मोकळी जागा व मैदानासह सुसज्ज बांधकाम केले जाणार असून 18 मीटरचा सार्वजनिक रस्ता प्रस्तावित आहे. पाणी, वीज, गटार व वाहनतळाच्या आराखड्याबरोबरच सुसज्ज रस्त्याचा आराखडा तयार करणायात आला आहे. याशिवाय सामाजिक, सांस्कृतिक कार्यांसाठी सुसज्ज व्यवस्था असणार आहे. आराखड्यात शाळेच्या इमारतीसह सेंद्रिय खतनिर्मिती प्रकल्पाचा समावेश आहे. वसाहतीमधील 90 टक्के पात्र रहिवाशांनी या प्रकल्पासाठी आपल्याला सहमतीपत्र दिल्याचा दावा कंपनीने केला आहे.

Tags : Mumbai, Colaba, slum, smart city, Mumbai news,