Sat, Apr 20, 2019 08:17होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कारवायांचा दणका, तरीही कोकेन तस्करी सुरूच

कारवायांचा दणका, तरीही कोकेन तस्करी सुरूच

Published On: Feb 07 2018 1:38AM | Last Updated: Feb 07 2018 12:51AMमुंबई : पुढारी वृत्तसेवा

अमली पदार्थ विरोधी पथकाच्या सातत्याने होणार्‍या कारवाया, अनेक तस्करांना झालेली अटक, विविध ठिकाणी टाकण्यात आलेल्या धाडीनंतरही कोकेनची पाळेमुळे मुंबईत घट्ट रुजल्याचे दिसून येत आहे. हाय प्रोफाईल वर्गात कोकेनचा वापर वाढला असून, त्याचा पुरवठा करणार्‍यांची संख्याही सातत्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. 

डिसेंबर 2017 मध्ये बकुळ चंदेरिया (45) याला खार येथील घरातून 8.48 लाख रुपयांच्या (106 ग्रॅम) कोकेनसह अटक करण्यात आली होती. त्यावेळी 4 लाखांचे लिसर्जिक अ‍ॅसिड डिथिलामाईड (एलएसडी) जप्‍त करण्यात आले होते. 

अँटी नार्कोटिक्स विभागातील अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार चंदेरिया हा पाली हिल येथे व्हीडिओ लायब्ररीच्या नावाखाली अंमली पदार्थांचे रॅकेट चालवत असून, त्याची अटक हे महिनाभर चाालेल्या मोहिमेचे यश आहे. सातवीतून शाळा सोडलेला बकुळ चंदेरी दुनियेतील तारे तारकांना कोकेनचा पुरवठा करीत असून, ते सिद्ध करण्यासाठी कोणताही पुरावा नसल्याचे अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. 

2017 साली अँटी नार्कोटिक्स विभागाने 11 गुन्हे दाखल करुन 24 जणांना अटक केली आहे. या कारवाईत 44.53 लाखांचे 782 ग्रॅम कोकेन जप्‍त करण्यात आले आहे. एवढी कारवाई होऊनही कोकेनच्या नशेचे जाळे अद्याप कार्यरत असल्याचे बकुळच्या अटकेने स्पष्ट झाले आहे. 

प्रचंड आर्थिक उत्पन्‍न, तेवढ्याच प्रमाणात असलेला तणाव यांमुळे बडी धेंडे कोकेनकडे आकर्षिली जातात. अलिकडे कोकेन ही या वर्गाची लाईफ स्टाईलच झालेली आहे, असे एका अधिकार्‍याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले. 

1980 आणि 90 च्या दशकात दाऊद इब्राहिम आणि छोटा राजन यांच्यासारखे बडे गँगस्टर्स मुंबईतील अंमली पदार्थांचा व्यवसाय सांभाळायचे. आता कोलंबियन तरुणांनी त्यात बस्तान बसवले आहे. या तस्करांना उत्तर अमेरिका आणि युरोपियन देशांत मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागले आहे, त्यामुळे त्यांनी भारत आणि मध्य पूर्व आशियाकडे लक्ष केंद्रित केले आहे. 

संयुक्‍त राष्ट्रसंघाच्या अमली पदार्थ आणि गुन्हेगारी विषयक अहवालात आशियात होणार्‍या कोकेन तस्करीचा उगम, पाठवणी आणि वाहतूक ब्राझील, कोलंबिया, पेरु, बोलिव्हिया, अर्जेंटिना आणि मेक्सिको या देशांतून होते. नायजेरिया आणि दक्षिण आफ्रिका या देशांचा वापर ट्रान्स शिपमेंटसाठी केला जातो. थायलँड, मलेशिया, फिलीपाईन्स आणि भारत या देशांत कोकेन व्यापाराचे मोठे जाळे आहे, असे अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. जून 2006 साली जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट येथे 200 किलो कोकेन जप्‍त करण्यात आले होते. तेव्हापासून कोकेन तस्करांनी तस्करीची पद्धती बदलली आहे. आता तस्करीसाठी छोट्या छोट्या प्रमाणात कोकेन आफ्रिकन तरुणांच्या माध्यमातून पाठवले जाते. मुंबईत आतापर्यंत पकडण्यात आलेले ड्रग पेडलर्स आफ्रिकन देशातील विशेषत: नायजेरियन आहेत.