घाटकोपरमध्ये कोचिंग क्लासच्या चालकाची हत्या

Published On: Sep 23 2019 2:25AM | Last Updated: Sep 23 2019 2:20AM
Responsive image


घाटकोपर : वार्ताहर

गेल्या आठवड्यात गोवंडीत एका अल्पवयीन विद्यार्थ्याने आपल्या शिक्षिकेची हत्या केल्याची घटना ताजी असताना, रविवार दि. 22 रोजी संध्याकाळी साडेसहा वाजताच्या दरम्यान घाटकोपर येथे  मयांक ट्युटोरियल या प्रसिद्ध खासगी क्लासचे मालक मयांक मणदोत(27) यांची त्यांच्याच कर्मचार्‍याने  हत्या केली.

गणेश पवार(25) या कर्मचार्‍याने पैशाचा वाद आणि कामावरून काढल्याच्या रागातून ही हत्या केली आहे. मयांक ट्युटोरियलचे मालक असलेले मयांक हे विज्ञान विषयाचे शिक्षक होते.अल्पावधीत त्यांनी मुंबईत विविध ठिकाणी त्यांच्या क्लासच्या शाखा उघडल्या होत्या. घाटकोपर पूर्व येथे ते विज्ञान विषय शिकविण्यास आणि क्लासला भेट देण्यास येत असत,तर चारच महिन्यांपूर्वी त्यांच्या क्लासमध्ये गणेश पवार हा रिसेप्शनिस्ट म्हणून कामाला लागला होता; परंतु काही कारणास्तव मयांक यांनी त्याला तीन-चार दिवसांपूर्वी कामावरून काढून टाकले होते.रविवारी मयांक या 

शिकवणी घेण्यास आले होते तेव्हा गणेश पवार तिथे आला.त्याची मयांक यांच्याशी पगारावरून आणि कामावरून काढल्याच्या वादावरून शाब्दिक बाचाबाची झाली आणि त्याने धारधार शस्त्राने मयांक यांच्यावर वार केले,तर स्वतःवरदेखील वार करून घेतले.या वेळी या क्लासमध्ये असलेल्या मुलांनी आणि स्थानिकांनी आरडाओरडा करीत त्वरित क्लासचे शटर लावून घेतले आणि पोलिसांना याची माहिती दिली.पंतनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेतले आणि जखमी अवस्थेत असलेले मयांक तसेच आरोपी गणेशला राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.परंतु डॉक्टरांनी मयांक यांना मयत घोषित केले.गेल्या काही महिन्यात घाटकोपरमध्ये होत असलेल्या हत्येच्या गुन्ह्यात झालेली वाढ आणि आता पुन्हा एकदा एक हत्या झाल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली असून घाटकोपरमध्ये कायदा सुव्यवस्था राहिली आहे का? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.