Sat, Mar 23, 2019 16:20होमपेज › Mumbai-Thane-Raigad › उल्हासनगरात कपडा व्यापार्‍याची हत्या 

उल्हासनगरात कपडा व्यापार्‍याची हत्या 

Published On: Aug 10 2018 1:38AM | Last Updated: Aug 10 2018 1:17AMउल्हासनगर : वार्ताहर

बुधवारी रात्री चालिया मंदिरात जातो असे सांगून जाणार्‍या मात्र त्यानंतर घरी न परतणार्‍या 55 वर्षीय कपडा व्यापार्‍याची त्याच्या दुसर्‍या फ्लॅटमध्ये हत्या झाल्याची घटना गुरुवारी दुपारी उल्हासनगरात उघडकीस आली. प्रकाश कछानी असे हत्या झालेल्या व्यापार्‍याचे नाव आहे. या घटनेने संपूर्ण उल्हासनगरात एकच खळबळ उडाली आहे. यावेळी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, ही हत्या नेमकी कोणत्या कारणावरून झाली, याचा पोलीस तपास करीत आहेत. 

उल्हासनगर 17 सेक्शन परिसरात राहणारे प्रकाश यांचे अमन चित्रपटगृहाच्या रोडवर प्रकाश कलेक्शन हे कपड्याचे शोरूम आहे. बुधवारी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास प्रकाश यांनी शोरूम बंद केले. कॅम्प नं. 5 मधील चालिया मंदिरात माथा टेकून येतो असे त्यांनी कुटुंबीयांना सांगितले. मात्र ते रात्रभर घरी परतलेच नसल्याने त्यांच्या पत्नी, मुलांनी नातलग, मित्रांकडे चौकशी केली. प्रकाश यांचा फोन बंद येत असल्याने सर्व अस्वस्थ होते. 

दरम्यान, उल्हासनगरातीलच चोपडा कोर्ट परिसरात हरीओम अपार्टमेंटमध्ये प्रकाश यांच्या पत्नीच्या नावे फ्लॅट नं. 301 आहे. तिथे कुणी राहत नाही. पण अधूनमधून कधीतरी प्रकाश या फ्लॅटवर जात असे. वडील हरिओममध्ये तर गेले नाही ना, या विचाराने प्रकाश यांची मुले राजा व पप्पन गुरुवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास फ्लॅटवर गेले असता फ्लॅटचा दरवाजा किंचितसा उघडा होता. त्यांनी दरवाजा उघडून आत प्रवेश करताच वडिलांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला त्यांना दिसला. 

या घटनेची माहिती मध्यवर्ती पोलिसांना समजताच सहाय्यक पोलीस आयुक्त मारुती जगताप, मध्यवर्ती ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय डोळस यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी  पंचनामा करून प्रकाश यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात पाठवला आहे. या प्रकरणी अनोळखी व्यक्ती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.