Sat, Mar 23, 2019 12:02होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कापडी पिशव्या भाव खाणार

कापडी पिशव्या भाव खाणार

Published On: Jun 23 2018 1:21AM | Last Updated: Jun 23 2018 1:06AMमुंबई : प्रतिनिधी

संपूर्ण महाराष्ट्रात आजपासून होणार्‍या प्लास्टिकबंदीमुळे पर्यायी कापडी पिशव्यांची मागणी जोरात वाढणार आहे. महिलावर्गाला घराबाहेर पडले की बाजारातून खरेदीसाठी पिशव्यांची गरज पडते.प्रत्येक दुकानदाराकडे प्लास्टिक पिशवी मिळायची. त्यामुळे महिलांना रिकाम्या हाताने बाहेर पडायची सवय होती.मात्र आजपासून या सवयीला पूर्णविराम लागणार आहे.कापडी पिशवी घेऊनच घराबाहेर पडणारी महिला आजपासून दिसणार आहे.या प्लास्टिकबंदीमुळे कापडी पिशव्या मात्र भलत्याच भाव खाणार आहेत.

सरकारने केलेल्या प्लास्टिक पिशव्या बंदीमुळे बाजारात पर्यायी इतर पिशव्यांना मागणी वाढणार आहे. या बंदीमुळे सगळ्यांनी कापड पिशव्यांकडे लक्ष केंद्रित केले आहे. कारण या प्रत्येक वर्गाला परवडणार्‍या असतात.कमी पैशात त्वरित उपलब्ध होणार्‍या असतात.घरातील जुने कपडे गोळा करून त्यांना कापडी पिशव्यांत रूपांतरित करण्याचे प्रमाण अचानक वाढणार आहे.

कापडी पिशव्यांसह पेपर पिशव्या,विणलेल्या पिशव्या,जूट पिशव्या वापरताना महिलावर्ग दिसणार आहे. पेपरच्या पिशव्या केवळ लहान गोष्टींसाठी वापरता येणार आहेत.तसेच विणलेल्या पिशव्या मात्र ठरावीक महिलावर्गातच दिसतील.कारण अशा प्रकारच्या पिशव्या बाजारात विक्रीस फार कमी असतात अशा पिशव्या महिला घरीच तयार करतात.तर ज्यूट बॅगची मात्र चांगलीच मागणी वाढत आहे.तुलनेने महाग असली तरी महिला तरुणवर्गात तिचा वापर जास्त दिसणार आहे. किंमत जास्त असली तरी ज्यूट बॅगांची मागणी वाढणार आहे.