Sat, Feb 16, 2019 11:26होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कापड व्यापार्‍याच्या मारेकर्‍याला मुंबईत अटक

कापड व्यापार्‍याच्या मारेकर्‍याला मुंबईत अटक

Published On: Aug 30 2018 2:20AM | Last Updated: Aug 30 2018 1:37AMउल्हासनगर : वार्ताहर

डोक्यावर धोपटण्याने प्रहार करून उल्हासनगरातील कपडा व्यापार्‍याची 20 दिवसांपूर्वी फ्लॅटमध्ये निर्घृण हत्या करण्यात आली होती. या खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. अखेर 20 दिवसानंतर या हत्येप्रकरणी मुंबईतून आरोपीला अटक करण्यात मध्यवर्ती पोलिसांना यश आले आहे. संजय शर्मा (30) असे या आरोपीचे नाव असून, चोरीच्या उद्देशाने या व्यापार्‍याची हत्या केल्याचे चौकशीतून उघड झाले आहे.

शहरातील कॅम्प नं. 3 येथील 17 सेक्शन परिसरात राहणारे प्रकाश काशानी (54)यांनी 8 ऑगस्ट रोजी रात्री कपड्याचे शोरूम बंद केल्यावर कॅम्प नं.5 मधील चालिया मंदिरात माथा टेकून येतो असे घरच्यांना सांगितले होते. मात्र चोपडा कोर्ट परिसरात हरीओम अपार्टमेंटमधील एक फ्लॅटमध्ये  रक्ताच्या थारोळ्यात प्रकाश यांचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी मध्यवर्ती पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. पोलीस उपायुक्त प्रमोद शेवाळे, स. पो. आयुक्त मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली व. पो. नि. विजय डोळस यांनी हा खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी स. पो. नि. भिसे व पो. उप. नि. योगेश गायकर यांची दोन पथक तयार केले होते. 

ही हत्या प्रकाश यांच्या परिचयाच्याच एखाद्या व्यक्तीने केली असावी असा संशय पोलिसांना होता. दरम्यान, एक व्यक्ती घटनेच्या दिवशी प्रकाश यांना भेटण्यासाठी आली असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली होती. तब्बल 20 दिवस हे पथक हा खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत असताना प्रकाश यांचा मारेकरी हा मुंबई परिसरातील निर्मलनगर येथे लपून बसला असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्या माहितीवरून सपोनि अनिल भिसे, पीएसआय योगेश गायकर, एएसआय तडवी, पो.ना.भूंडेरे, संतोष चौधरी, काबाडी, सुभाष चव्हाण, प्रशांत चतुरभज, जितू पाटील आदी पोलिसांनी निर्मलनगर येथे जाऊन संजय शर्मा याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्यानेच प्रकाश यांची हत्या केली असल्याची कबुली पोलिसांना दिली.