Thu, Jan 17, 2019 18:30होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डोंबिवलीच्या २७ गावांतील सदनिकांचे रजिस्ट्रेशन बंद

डोंबिवलीच्या २७ गावांतील सदनिकांचे रजिस्ट्रेशन बंद

Published On: Apr 15 2018 1:28AM | Last Updated: Apr 15 2018 1:12AMडोंबिवली : वार्ताहर

शासनाचा अध्यादेश नसतानाही कल्याण-डोंबिवलीच्या 27 गावांतील रजिस्ट्रेशन सरसकट बंद केल्याने एकच खळबळ उडाली असून, यात शासनाचा महसूल बुडत आहेच, त्याशिवाय पै-पै जमा करून घराचे स्वप्न साकार करण्याच्या प्रयत्नात असलेल्या सर्वसामान्य नागरिकांनाही विनारजिस्ट्रेशन घेतलेल्या घरात राहावे लागत आहे. 

कल्याण-डोंबिवलीतील 27 गावांत मोठ्या प्रमाणावर नवीन बांधकामे बांधण्यात आली असून त्यात सतत भर पडत आहे. शहरी भागापेक्षा कमी दरात व आवाक्यात असलेल्या येथील घरांना अल्प व मध्यम उत्पन्न गटातील नागरिक पसंती देत आहेत. थोडी रक्कम आगाऊ देऊन, शक्य तशी उधार, उसनवारी किंवा कर्ज काढून ग्राहक बांधकाम व्यावसायिकास पूर्ण पैसे देतात. परंतु नोंदणीची वेळ आली की येथील दुय्यम निबंधक कार्यालयात दस्तऐवज नोंदणी (रजिस्ट्रेशन) बंद असल्याचे ग्राहकांना सांगितले जाते. घर नावे नोंद होत नसल्याने शेवटी ग्राहक हतबल होतो. विशेष म्हणजे गेल्याच महिन्यात झालेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित प्रश्नावर उत्तर देताना महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अशी कोणतीही बंदी नसल्याचे म्हटले होतेे.

मात्र खोटे कागदपत्र जोडून नोंदणी करण्याचा प्रयत्न उघडकीस आल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी सर्वच प्रकारचे रजिस्ट्रेशन बंद करण्याचे आदेश दिल्याचे येथील दुय्यम निबंधक उमेश शिंदे सांगतात. या परिसरात मोठ्या प्रमाणावर बांधकामे होत आहेत. त्यातील अधिकृत कोणते व अनधिकृत कोणते याची माहिती सर्वसामान्य नागरिकांना कशी मिळणार? हे सांगणारी सक्षम यंत्रणा कोणती या माहितीच्या अभावामुळे अनेक नागरिकांनी बांधकाम करणार्‍या बिल्डरांना लाखो रुपये देऊनसुद्धा त्यांना विना रजिस्ट्रेशन रहावे लागत आहे. सामान्यांना हा त्रास तर दुसरीकडे मोठ्या बांधकाम व्यावसायिकांची नोंदणीची कामे एकगठ्ठा पद्धतीने करण्यात येत असल्याचा आरोप येथील नागरिक करीत आहेत.

Tags : Mumbai, Closing registration, tenements,  27 villages, Dombivli, Mumbai news,