होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बंद पडलेली मोनोरेल ऑक्टोबरपासून सुरू

बंद पडलेली मोनोरेल ऑक्टोबरपासून सुरू

Published On: Jul 22 2018 1:24AM | Last Updated: Jul 22 2018 1:06AMमुंबई : प्रतिनिधी 

मोनो रेल्वेचा वडाळा ते चेंबूर हा पहिला टप्पा पुन्हा सुरू करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या असून प्रवाशांची प्रतीक्षा संपणार आहे. येत्या ऑक्टोबरपासून मोनो रेलला पहिला टप्पा सुरू होणार असून वर्षअखेरपर्यंत वडाळा ते सातरस्ता हा दुसरा टप्पाही सुरू होणार आहे. मोनोरेलच्या या दोन्ही टप्प्यांवर भाड्यामध्ये वाढ होईल, असे समजते. सध्या मोनोचे किमान भाडे 5 ते 19 रुपये असे आहे, ते यापुढे 10 ते 40 रुपये असेल, असे समजते. एकप्रकारे घाटकोपर वर्सोवा मेट्रो 1 मार्गाच्या धर्तीवर मोनोचे भाडे असेल. मेट्रोचे भाडे किमान 10 तर कमाल 40 रूपये इतके आहे. 

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात म्हैसूर कॉलनी स्थानकात मोनो रेलला आग लागल्याची घटना घडली होती. तेव्हापासून मोनो रेलची सेवा अद्याप बंदच आहे. गेल्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी प्रत्येक स्थानकाची पाहणी केल्यानंतर मोनो पुन्हा सुरू करण्यास हिरवा कंदील दिला होता. मात्र आगीच्या घटनेनंतर मोनोची सेवा चालवण्याची जबाबदारी स्कोमी इंजिनीयरिंग कंपनीकडेच द्यायची की नाही यासंदर्भात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) संभ्रमात होते. मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) मोनो चालवावी असा एमएमआरडीएचा प्रयत्न होता. मात्र एमआरव्हीसीकडून अद्याप काहीच प्रतिसाद न आल्याने मोनोची जबाबदारी पुन्हा स्कोमी इंजिनीअरिंगकडेच देण्यात येणार आहे. रिलायन्सही त्यासाठी इच्छुक होती, मात्र मोनो चालवण्यास रिलायन्सने मागितलेला मोबदला एमएमआरडीएला परवडणारा नव्हता. येत्या ऑक्टोबरपासून मोनो रेल्वेचा चेंबूर-वडाळा हा पहिला टप्पा सुरू करण्याची स्कोमी इंजिनीअरिंगची योजना आहे. फेब्रुवारी 2019 पर्यंत मोनोची संपूर्ण सेवा सुरळीत होईल, असा विश्वास एमएमआरडीएच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे.