Tue, Jun 02, 2020 03:43
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई स्टेज-3 च्या जवळ

मुंबई स्टेज-3 च्या जवळ

Last Updated: Apr 07 2020 1:10AM
मुंबई/नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

मुंंबईत सोमवारी 120 रुग्णांची भर पडत कोरोनाच्या एकूण रुग्णांची राज्यभरातील संख्या 868 वर पोहोचली. यात सर्वाधिक 68 नवे रुग्ण मुंबईचे तर त्या खालोखाल 41 पुण्याचे आहेत. एकाच दिवसात वाढलेली ही प्रचंड रुग्णसंख्या वेगळेच भयसंकेत देते. विशेषत: मुंबईत कोरोना साथीचा तिसरा भयंकर टप्पा सुरू झाला असू शकतो. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनीही मुंबईसह देशातील काही भागांत स्थानिक सामूहिक संसर्ग होत असल्याचे सोमवारी सांगितले. याचा अर्थ मुंबई कोरोना साथीच्या स्टेज-3 ला पोहोचते आहे. 

सोमवारी 7 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. 7 पैकी 4 जण मुंबईतील तर नवी मुंबई, ठाणे, वसई विरारमधील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 52 झाली आहे. 70 कोरोनाबाधित रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने घरी सोडण्यात आले, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 17 हजार 563 नमुन्यांपैकी 15 हजार 808 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरता निगेटिव्ह आले आहेत तर 868 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 32 हजार 521 व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून 3498 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

कोरोनामुळे स्थिती अद्यापही चिंताजनक आहे. काही ठिकाणी रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे, तर मुंबईप्रमाणे काही भागांमध्ये कोरोनाचा स्थानिक सामूहिक संसर्ग होत आहे. देश सध्या संसर्गाच्या दुसर्‍या तसेच तिसर्‍या टप्प्यात आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये संसर्ग दुसर्‍या टप्प्यातच आहे, असे मत एम्स संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केला. नागरिकांनी त्यामुळे लॉकडाऊन नियमांचे अधिक काटेकोररीत्या पालन करण्याची गरज निर्माण झाली आहे. 

अधिक सतर्कता आवश्यक

देशात असलेल्या कोरोना संसर्गाच्या काही ‘हॉटस्पॉट’मध्ये स्थानिक सामूहिक संसर्ग पसरत आहे. या स्थितीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात यश आले, तर चिंतेचे कारण नाही. सामूहिक संसर्ग काही भागांमध्ये सुरू झाला आहे. त्यामुळे पूर्वीपेक्षा अधिक सतर्कता बाळगण्याची आवश्यकता असल्याचे मत गुलेरिया यांनी व्यक्त केले. तबलिगी जमातमुळे संसर्गात थोडीफार वाढ झाल्याचेही ते म्हणाले. निजामुद्दीन येथील तबलिगी जमात मर्कजमधून देशातील विविध भागांमध्ये पोहोचलेल्या जमातींना ट्रेस करून ते ज्या ठिकाणी गेले होते तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन करणे आवश्यक आहे. संसर्गाचे कुठलेही लक्षण दिसून आले, तर त्यांनी स्वत:ला घरातच क्वारंटाईन करण्याचे आवाहन त्यांच्याकडून करण्यात आले आहे. 

संसर्गामुळे डॉक्टरांमध्ये दहशत 

डॉक्टरांनाही कोरोना संसर्गाची लागण होत आहे. दहशतीचे वातावरण त्यामुळे निर्माण झाले आहे. डॉक्टरांच्या कुटुंबीयांनाही कोरोना होऊ शकतो. नागरिकांनी त्यामुळे डॉक्टरांना अधिक सहकार्य करण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. 10 एप्रिलनंतर देशभरातील आकडेवारी आल्यानंतर लॉकडाऊनची मुदत वाढवण्यासंबंधी चिंतन करणे शक्य होईल. स्थिती सामान्य होण्यास अजून थोडा वेळ लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. देशात आतापर्यंत 281 रुग्ण पूर्णत: बरे झाले असून, 109 जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रापाठोपाठ राजधानी दिल्लीत 500 हून अधिक नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे, हे विशेष.

पुण्यात नवीन 37 कोरोनाग्रस्त

पुणे: जिल्ह्यात सोमवारी नवीन 37 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, त्यापैकी पुण्यातील 36, तर बारामतीतील एक रुग्ण आहे. नायडू रुग्णालयात, खासगी रुग्णालयात 30, तर ससून रुग्णालयात उर्वरित सात रुग्ण उपचार घेत आहेत. पुणे शहरात (113), पिंपरी-चिंचवड शहरात (20) आणि ग्रामीण भागात (8) असे मिळून जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 141 झाली आहे. यापूर्वी वीस कोरोनाग्रस्तांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. आज एकाही रुग्णाला घरी सोडले नाही. नवीन आढळलेल्या रुग्णांपैकी बहुतेक रुग्ण शहराच्या मध्यवस्तीतील आहेत. पुण्यात एकाच दिवशी इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण आज प्रथमच आढळून आले. पुण्यात काल रविवारी 18 नवीन रुग्ण वाढले होते, तर आज तीच संख्या दुप्पट झाली.