Fri, May 24, 2019 02:27होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कमी पटसंख्येच्या १३१४ शाळा बंद 

कमी पटसंख्येच्या १३१४ शाळा बंद 

Published On: Dec 03 2017 1:06AM | Last Updated: Dec 03 2017 12:26AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

महाराष्ट्र शिक्षणात प्रगत राज्य असल्याचे वारंवार सांगितले जात आहे. मात्र कमी पटसंख्या असल्याने विद्यार्थ्यांची गुणवत्ता खालावत असल्याचे कारण पुढे करत शिक्षण हक्क कायद्याचा आधार घेत राज्यातील 1314 शाळा पहिल्या टप्प्यात बंद करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शाळा बंद नाही,  तर विद्याथी व शिक्षकांचे जवळच्या शाळेत स्थलांतर करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे एकाही शिक्षकाला नोकरीतून कमी करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. 

शिक्षण हक्क कायद्यानुसार कमीत कमी एका शाळेत 20 विद्यार्थी असणे आवश्यक आहे. 1 किमी परिसरात विद्यार्थी सहज शाळेत चालत जाऊ शकतील अशा शाळांची निर्मिती करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार 20 पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय काँगेस आघाडी सरकारच्या काळातच ऑक्टोंबर 2011 मध्ये घेण्यात आला आहे. त्या निर्णयाची अंमलबजावणी केल्यास राज्यातील जवळपास 12 हजार शाळांपर्यत ही संख्या जाईल. राज्यातील एकंदर भौगोलिक परिस्थिती विचारात घेऊन शाळा ते शाळा जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता 5002 शाळांत 10 पेक्षा कमी पटसंख्या असल्याचे आढळून आले. त्यातील ज्या शाळांतील विद्यार्थी व शिक्षकांना इतर शाळांत सामावून घेणे सहज शक्य आहे. अशा शाळा पहिल्या टप्प्यात स्थलांतरित करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री तावडे यांनी दिली.