Mon, Sep 24, 2018 17:53होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कल्याणमधील जुना पत्रीपूल बंद

कल्याणमधील जुना पत्रीपूल बंद

Published On: Jul 12 2018 1:42AM | Last Updated: Jul 12 2018 1:23AMकल्याण : वार्ताहर

प्रसारमाध्यमांनी झोड उठवल्यानंतर वाहतुकीसाठी धोकादायक असलेला कल्याणमधील जुना पत्री पूल वाहतुकीसाठी अखेर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचे पत्र रेल्वेने वाहतूक शाखेला धाडत या पुलावरून वाहतूक बंद करण्याचे निर्देश दिले होते. या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेने हा पूल बंद करण्याचा निर्णय घेतला असून याबाबतचे पत्र जिल्हाधिकार्‍यांसह, कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त, ठाणे पोलीस आयुक्त यांना दिले आहे. 

या जुनाट पुलावरून वाहतूक बंद झाल्याने त्यावरील वाहतूक नव्या पत्री पुलावरून वळविण्यात येणार आहे. त्यामुळे आधीच वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या कल्याणकरांच्या त्रासात आणखीनच भर पडणार आहे. कल्याण शहरात दुर्गाडी पूल आणि पत्री पूल हे दोन ब्रिटिशकालीन पूल असून या पुलांचे आयुर्मान संपल्याचे पत्र ब्रिटिश सरकारने राज्य शासनाच्या माध्यमातून कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाला पाठविले होते. मात्र यानंतर सुद्धा या पुलाचा वापर सुरूच आहे. पत्री पूल 2013 साली एमएसआरडीसीकडे हस्तांतरित करण्यात आला. तत्पूर्वी हा पूल सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आणि नंतर केडीएमसीच्या ताब्यात होता. 2003 साली 100 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर या पुलाचा सर्व्हे करण्यात आला होता. त्यानंतर या पुलावरून जड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला असला तरी आजमितीला या पुलावरून जड वाहनांची वाहतूक सुरूच आहे. त्यामुळे या पुलाचा प्रश्न ऐरणीवर आला होता. मागील वर्षी या पुलाचा संरक्षक कठडा ढासळल्यानंतर एमएसआरडीसीकडून याठिकाणी तात्पुरती मलमपट्टी करत या पुलावरून वाहतूक सुरूच ठेवण्यात आली होती. 

अंधेरी येथील पादचारी पुलाच्या दुर्घटनेनंतर कल्याणच्या या धोकादायक पुलाकडे रेल्वे आणि शासनाचे दुर्लक्ष होत असल्याबाबत माध्यमांनी टीकेची झोड उठवली होती. याचीच दखल घेत हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचे पत्र रेल्वेने पुन्हा एकदा धाडले. त्यानंतर आता वाहतूक विभागाने या पुलावरील वाहतूक बंद करण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत. जुन्या पुलावरून वाहनांना प्रवेश बंद करत ही वाहतूक नव्या पुलावरून वळविण्यात येणार असल्याने या पुलावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होणार, हे निश्चित आहे. पूर्वी एकमार्गी असलेल्या या पुलावर दररोज वाहतूक कोंडी होत असताना आता या कोंडीत भर पडणार असून, शहराला मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे.