Mon, Aug 19, 2019 07:20होमपेज › Mumbai-Thane-Raigad › स्वच्छता अ‍ॅप सर्वेक्षणात ठाणे देशात दुसरे

स्वच्छता अ‍ॅप सर्वेक्षणात ठाणे देशात दुसरे

Published On: Feb 08 2018 1:48AM | Last Updated: Feb 08 2018 12:23AMठाणे : प्रतिनिधी

स्वच्छता अ‍ॅप सर्वेक्षणामध्ये मागील महिन्यापर्यंत देशात 27 व्या क्रमांकावर असणारे ठाणे शहर आता देशात दुसर्‍या क्रमांकावर तर महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांकावर जाऊन पोहोचले आहे. ताज्या सर्वेक्षणानुसार स्वच्छता अ‍ॅपचा वापर करणार्‍यांची संख्या 47 हजारांवर पोहोचली आहे. याच महिन्यात दिल्लीची टीम ठाणे शहराच्या स्वच्छता सर्वेक्षणासाठी येणार असून प्रत्यक्ष पाहणीमध्ये ठाणे शहर कोणत्या क्रमांकावर जाते हे त्याचवेळी स्पष्ट होईल.  

आजच्या घडीला ठाणे महापालिकेच्या स्वच्छता अ‍ॅपवर 47,587 नागरिकांनी प्रतिसाद दिला आहे. यापैकी 14,328 नागरिक हे सक्रिय  आहे.  सक्रिय असलेल्यांची संख्या कमी असली तरी देखील पालिकेने अ‍ॅपच्या सर्व्हेत  केवळ एका महिन्यातच 27 वरून थेट राज्यात क्रमांक 1 पर्यंतची तर देशात दुसर्‍या क्रमांकापर्यंत मजल मारली आहे. 

स्वच्छता अ‍ॅपच्या बाबतीत उदासीन धोरण राबवणार्‍या ठाणे महापालिकेला सुरुवातीला ठाणेकरांनी अल्प प्रतिसाद दिला होता. डिसेंबर अखेरपर्यंत 40 हजार नागरिकांची नोंदणी अपेक्षित असताना हे अ‍ॅप केवळ 24 हजार नागरिकांनीच डाऊनलोड केले होते. मात्र, आता तब्बल 47 हजार 587 नागरिकांनी हे अ‍ॅप डाऊनलोड केले आहे. 40 हजार नागरिकांनी अ‍ॅप डाउनलोड केला तर पालिकेला 150 गुण मिळतात. पण, महापालिकेने त्या पलीकडे उडी घेतली आहे. जनाग्रह अ‍ॅपच्या जनजागृतीसाठी विशेष कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार 6 फेब्रुवारीपर्यंत हे अ‍ॅप डाऊनलोड करण्याचा आकडा 47,587 एवढा झाला. तर अ‍ॅपचा वापर करणार्‍यांची संख्या 14,328 एवढी  आहे. तर 33 हजार 259 नागरिकांनी हा अ‍ॅप केवळ डाऊनलोड केला आहे.