Tue, Mar 26, 2019 12:17होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सीबीएसई दहावीवर मुलींचेच वर्चस्व !

सीबीएसई दहावीवर मुलींचेच वर्चस्व !

Published On: May 30 2018 2:14AM | Last Updated: May 30 2018 2:01AMमुंबई : प्रतिनिधी

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) मंगळवारी जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात नव्वदी पार केलेले तब्बल 1 लाख 31 हजार 493 विद्यार्थी आहेत तर पहिल्या चार जणांना 500 पैकी 499 गुण मिळाले आहेत. विशेष म्हणजे यामध्ये तीन मुली आहेत. यंदा निकाल 86.70 टक्के लागला आहे. मागील वर्षी हा निकाल 92.6 टक्के इतका लागला होता. यंदाच्या निकालात गत वर्षाच्या तुलनेत सहा टक्क्यांनी घसरण झाली तरी नव्वदी पार केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या यंदा दीड लाखाच्या घरात आहे. 

गेल्या शनिवारी बारावीचा निकाल जाहीर केल्यानंतर सीबीएसई बोर्डाने मंगळवारी दहावीचा निकाल ऑनलाइन जाहीर केला. विभागीय निकालात यंदा तिरूअनंतपुरम विभागाने बाजी मारली असून या विभागाचा निकाल 99.60 टक्के लागला आहे. तर त्यापाठोपाठ महाराष्ट्राचा समावेश असलेला चेन्नई विभाग दुसर्‍या स्थानावर असून चेन्‍नईचा निकाल 97.37 टक्के लागला आहे. 17 हजार 567 शाळेतील 16 लाख 24 हार 682 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 14 लाख 8 हजार 594 विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत. या विद्यार्थ्यांची एकूण टक्केवारी 86.70 टक्के इतकी असून बारावीप्रमाणे दहावीच्या निकालातही मुली आघाडीवर आहेत. एकूण निकालात मुलींचा निकाल 88.67 टक्के तर मुलांचा निकाल 85.32 टक्के इतका आहे. दोन निकालाची तुलना केल्यास 3. 35 टक्के इतकी मुलींच्या निकालात वाढ आहे. टॉपर असलेल्या चौघांना 500 पैकी 499 गुण मिळाले आहेत. गुरुग्रामचा प्रखर मित्तल, बिजनोरमधील रिमझिम अग्रवाल, शामलीची नंदनी गर्ग आणि कोचीनमधील श्रीलक्ष्मी जी या चौघांनी पहिला क्रमांक मिळवला आहे. 

या विद्यार्थ्यांचा निकाल 98.32 टक्के लागला असून 23 हजार 787 बसले होते त्यापैकी 23 हजार 388 विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. त्याचबरोबर विशेष विद्यार्थ्यांनी ही आपली छाप उमटवली असून त्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 92. 55 % इतकी आहे. यामध्ये अनुष्का पांडा हिने 489 गुण मिळवून प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. सानया गांधी हिने 489 तर सोमया प्रधान हिने 484 गुण मिळवून दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला आहे. 3 हजार 760 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 3 हजार 480 विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत.