Thu, Apr 25, 2019 11:56होमपेज › Mumbai-Thane-Raigad ›

दहावी बदलली!

दहावी बदलली!

Published On: Apr 05 2018 2:24AM | Last Updated: Apr 05 2018 2:24AMमुंबई : पवन होन्याळकर 

त्याच त्याच शिकवण्याच्या पद्धती आणि घोकंपट्टीला फाटा देत प्रत्येक विषयाच्या पुस्तकातील ज्ञान व्यावहारिक जीवनाशी जोडण्याचा प्रयत्न करीत दहावीचा नवा अभ्यासक्रम तयार करण्यात आला असून, बुधवारी दादरच्या शिवाजी मंदिरात बालक-पालकांच्या उपस्थितीत नव्या अभ्यासक्रमाची पुस्तके  शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते प्रकाशित झाली. 

सातवी आणि नववीच्या वर्गाच्या अभ्यासक्रमाची पुनर्रचना गेल्या वर्षी झाली. यंदा दहावी, आठवी आणि पहिलीचा अभ्यासक्रम बदलला आणि  दहावीची पुस्तके बाजारात दाखलही झाली. विद्यार्थी स्पर्धेत कमी पडू नयेत, म्हणून स्वयंअध्ययनाची कौशल्ये विकसित करण्याचे प्रयत्न नव्या अभ्यासक्रमात केले आहे. पाठांतर करुन घेण्याऐवजी आता शिक्षकांची भूमिका ही मार्गदर्शकाची ठेवण्याचा प्रयत्न यातून केला आहे. 

मुलांना सर्वात तापदायक ठरणारे बिजगणित रोजच्या जगण्याचे गणित सोडवणारे असेल. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या हाती पडलेल्या बिजगणिताच्या पुस्तकात अलीकडेच देशभर लागू झालेला जीएसटी, चाकरमान्यांचा सततचा चिंतेचा विषय इन्कम टॅक्स आणि शेअर बाजारही अभ्यासायला मिळणार आहे. 

जीएसटी लावलेल्या बिलात नेमके गणित काय आहे, आयकर कसा भरला जातो, शेअरबाजार आदी विषयांची माहितीही विद्यार्थ्यांना दहावीचे गणित शिकताना मिळणार असल्याचे  गणित विषय अभ्यास मंडळाच्या अध्यक्षा मंगला नारळीकर यांनी सांगितले. गणित हा विषय एकदम किचकट या भावनेला छेद देण्याचा प्रयत्न यंदाच्या अभ्यासक्रमात केला आहे. विद्याथ्यार्ंनी गणिताचे पुस्तक आवर्जून वाचावे यासाठीही अनेक सूत्रांचा अवलंब केला आहे. गणिताची सूत्रे कशी तयार होतात, त्यांचा पडताळा आणि त्याची उपाययोजना या त्रीसूत्रीला महत्त्व गणिताच्या अभ्यासक्रमात दिले आहे. अनेक प्रकारांनी एकच उदाहरण सोडवण्याची मोकळीक विद्यार्थ्यांना दिली आहे. दोन चलातील तीन समीकरणे सोडवणे खूप किचकट असते, यासाठी बरीच आकडेवारी आवश्यक असते. त्यावेळी क्रेमरचा नियम वापरण्याची मुभा दिल्याचे नारळीकर म्हणाल्या.