होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पालघरमध्ये कनिष्ठ सहाय्यक पुन्हा झाले शिपाई!

पालघरमध्ये कनिष्ठ सहाय्यक पुन्हा झाले शिपाई!

Published On: Feb 10 2018 9:08AM | Last Updated: Feb 10 2018 9:08AMमोखाडा : हनिफ शेख

पालघर, ठाण्यातील कर्मचार्‍यांचे समायोजन होण्यापूर्वी पालघरमधील तब्बल 100 शिपायांना वर्षभरापूर्वी पदोन्नती देऊन कनिष्ठ सहाय्यक पदी बढती देण्यात आली होती. याविरोधात ठाणे जिल्ह्यातील शिक्षक संघटना न्यायालयात गेल्या होत्या. आता हा निर्णयच रद्द करण्यात आल्यामुळे पालघरमधील 100 शिपायांना मिळालेली पदोन्नती रद्दबातल ठरली आहे. त्यामुळे वर्षभर कनिष्ठ सहाय्यक पदी काम केल्यानंतर या सर्वांना पुन्हा शिपाई पदावर काम करावे लागणार आहे. दरम्यान, समायोजनानंतरच आता पुढील कार्यवाही होणारआहे.

1 जानेवारी 2015 सेवा ज्येष्ठता यादीनुसार पदोन्नती करणे आवश्यक आहे. ठाण्याचे विभाजन होऊन पालघर जिल्हा निर्माण झाला. त्यामुळे पालघर जिल्हा परिषदेने 22 जुलै 2016 च्या शासकीय आदेशानुसार जिल्ह्यातील 100 शिपायांना पदोन्नती दिली. यामध्ये 80 कनिष्ठ साहाय्यक, तर 13 ड्रेसर आणि 7 कनिष्ठ लेखाधिकारी म्हणून काम करायला लागले.

पदोन्नतीमुळे या कर्मचार्‍यांनी सेवा परीक्षाही दिल्या नाहीत. पण, हे सगळं करताना ठाणे जिल्ह्यातील कर्मचारी पालघरात अन् पालघर मधले कर्मचारी ठाण्यात, असे समायोजन करणे बाकी होते. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील शिपाई साहेब झाले, मात्र ठाण्यातील शिपाई शिपाईच राहिले.

समायोजनानंतर ठाण्यातील कर्मचारी पालघरमध्ये जातील तेव्हा काय असा प्रश्‍न निर्माण झाल्यामुळे ठाण्यातील शिक्षकांनी या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेच्या सुनावणीत 100 शिपायांची बढती रद्द करण्यात आली. आता, समायोजनानंतर ही पदोन्नती प्रक्रिया पुन्हा राबविण्यात येईल, पण यासगळ्या घोळात पालघरमधील त्या 100 कर्मचार्‍यांना नाहक मानसिक त्रास झाला त्यांचे काय?

या निर्णयामुळे बढती झालेल्या शिपायांना पुन्हा शिपाई म्हणून काम करावे लागणार आहे. तर दुसरीकडे पंचायत सामिती स्तरावरील कनिष्ठ सहाय्यक पदे रिकामी होऊन अडचण निर्माण होणार आहे. त्यातच समायोजनानंतर जेव्हा सेवाजेष्ठतेनुसार पदोन्नती होईल तेव्हा सध्याच्या पदोन्नतीमधील बरेच कर्मचारी गाळले जाणार हे नक्की. पण, शासनाच्या गोंधळी कारभाराने कनिष्ठ साहाय्यक पुन्हा शिपाई होणार हे नक्की.