Wed, Mar 20, 2019 02:34होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आज कुठे पडणार चिनी प्रयोगशाळा?

आज कुठे पडणार चिनी प्रयोगशाळा?

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई/बीजिंग/नवी दिल्‍ली : वृत्तसंस्था

चीनची अनियंत्रित झालेली ‘टायोेगोंग-1’ ही अवकाश प्रयोगशाळा सोमवारी सकाळी पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करणार असून, ऑस्ट्रेलिया ते अमेरिकादरम्यान कुठेही कोसळू शकते, असा अंदाज चिनी अधिकार्‍यांनी रविवारी व्यक्‍त केला. या उपग्रहाचे तुकडे मुंबईतदेखील कोसळू शकतात. त्यामुळे या घटनेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान, भारतीय अंतराळ संशोधकांनी या प्रयोगशाळेचे तुकडे महाराष्ट्रातही पडण्याची शक्यता व्यक्‍त केली होती. त्यात रविवारी मुंबईचीदेखील भर पडली आहे.

सोमवारी सकाळी 7 वाजून 26 मिनिटे ते दुपारी 3 वाजेपर्यंत पृथ्वीच्या कक्षेत ही प्रयोगशाळा प्रवेश करेल, असा अंदाज आहे. मात्र, या प्रयोगशाळेचे तुकडे नेमके कुठे पडतील, याबाबत कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही. काही तज्ज्ञांच्या मते एखाद्या समुद्रातच अवशेष पडतील, तर काहींच्या मते याचे अवशेष पृथ्वीपर्यंत येणार नाहीत तर अवकाशात नष्ट होतील. सध्याच्या अंदाजानुसार अमेरिका ते ऑस्ट्रेलियादरम्यान अवशेष कुठेही पडण्याची शक्यता आहे. यात अमेरिकेच्या दक्षिण भागात सावधगिरीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्रातून सुमारे अडीच मिनिटे प्रवास केल्यानंतर पुढील दोन मिनिटे नेपाळमार्गे तिबेटकडे सरकेल. औरंगाबाद, पैठण, जालना या भागात काही तुकडे कोसळण्याची शक्यता आहे. मुंबईदेखील या प्रयोगशाळेच्या कक्षेत असल्याने मुंबईच्या परिसरातही हे तुकडे पडू शकतात. पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केल्यावर ‘टायोगोंग-1’जळण्यास सुरुवात होईल. सर्वप्रथम त्यावरील सौरपॅनेल जळून जातील. नंतर ‘टायोगोंग-1’चे मोठे दोन-तीन तुकड्यांत रूपांतर होईल. हे तुकडे पुढे सरकत वातावरणात आणखी खाली घसरतील आणि त्याचे पुन्हा अनेक लहानलहान तुकड्यांमध्ये रूपांतर होऊन ते जळतील. ‘टायोगोंग-1’ संपूर्ण जळून खाक होईपर्यंत साधारण 2000 कि.मी. अंतर पार करेल. याचे तुकडे साधारण 70 कि.मी. रुंदीच्या पट्ट्यात विखुरण्याची शक्यता आहे.

Tags : mumbai news, Chinese astronaut, Tyogong-1, entered, Earths orbit, Monday morning,


  •