होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुलांना घरातही वाटते असुरक्षित

मुलांना घरातही वाटते असुरक्षित

Published On: Jul 08 2018 1:44AM | Last Updated: Jul 08 2018 12:56AMमुंबई : पुढारी वृत्तसेवा

मुंबईतील काही भागात एका एनजीओने केलेल्या पाहणीमध्ये 11 ते 18 वयोगटातील मुलांमध्ये शाळेत, तसेच घरातही मोठ्या प्रमाणात असुरक्षिततेची भावना असल्याचे आढळून आले आहे. त्यापाठीमागे घरात होणारे वादविवाद, दारूच्या सेवनानंतर उद्भवणारे वाद, पालकांमधील भांडणे, राहात असलेली स्थिती, एकांत नसणे, लैंगिक छळ व मिळणारी शारीरिक शिक्षा आदी बाबी मोठ्या प्रमाणात कारणीभूत असल्याचे संस्थेला आढळून आले आहे. 

हा पाहणी अहवाल महाराष्ट्र स्टेट कमिशन फॉर द प्रोटेक्शन ऑफ चाईल्ड राईटच्या सदस्य-सचिव सीमा व्यास यांनी मुंबईत घोषित केला. या अहवालातील निष्कर्ष कमालीचे गंभीर असून प्रत्येक कुटुंब, तसेच शाळेने मुलांच्या निकोप वाढीसाठी त्याकडे तितक्याच गांभीर्याने पाहिले पाहिजे. ‘प्रमोटिंग सेफ कम्युनिटीज ः मॅपिंग वुईथ चिल्ड्रेन इन मुंबई’ हा विषय घेऊन दिल्लीस्थित अ‍ॅक्शन फॉर चिल्ड्रेन्स इन्वाइरन्मेंट(एसीई) या एनजीओ संस्थेने ही पाहणी केली असून त्यासाठी युनिसेफचे अर्थसहाय्य घेण्यात आले होते.

हा अभ्यास गत चार वर्षांपासून सुरू होता. पाहणीमध्ये मानखुर्दमधील लल्लुभाई कंपाऊंड, एम पूर्व वॉर्डमधील रफीनगर झोपडपट्टी व आर उत्तर वॉर्डमधील दहिसरची शिवाजीनगर झोपडपट्टी या वस्तींचा समावेश होता. 2014 मध्ये सुरू झालेल्या या अभ्यास मोहिमेमध्ये 1881 घरांतील 9478 मुलांची पाहणी करण्यात आली. प्रत्येक घरापाठीमागे घरातील सदस्यांचे प्रमाण हे सरासरी 5.28 सदस्य इतके होते. 

हा अभ्यास करताना सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास, कमी मानवी विकास निर्देशांक, टोकाची गरिबी व धोकादायक स्थितीतील वसतिस्थान अशा काही घटकांना महत्त्व देण्यात आले होते. त्याशिवाय या अभ्यासासाठी सुरक्षा आणि सुरक्षितता, संरक्षण, पर्यावरण, आरोग्य, शिक्षण, खेळ व मनोरंजन,  त्याचबरोबर सहभाग व सशक्तीकरण हे मापदंड निश्‍चित करण्यात आले होते. 

देवनार भागातील मुलांची वेगळीच समस्या आहे. येथील 13 वयोगटातील जास्तीत म्हणजे जवळजवळ 90 टक्के मुले ही देवनार डंपिंग ग्राऊंडमध्ये स्क्रॅप गोळा करण्यासाठी जातात. नंतर हे स्क्रॅप एखाद्या डीलरला विकले जाते. विशेष म्हणजे, यातील असंख्य मुले ही मजूर म्हणून काम करतात.      

दिल्लीस्थित अ‍ॅक्शन फॉर चिल्ड्रेन्स इन्वाइरन्मेंट(एसीई) या एनजीओ संस्थेसाठी ही माहिती गोळा करण्याचे काम मुंबईस्थित कमिटी कम्युनिटीज डेव्हलपमेंट ट्रस्ट, प्रथम मुंबई एज्युकेशन इनिशिएटिव्ह अँड युथ फॉर युनिटी व वॉलंटरी अ‍ॅक्शन या तीन संस्थांनी केले आहे.