होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सरोगसी बाजाराला बालहक्‍क आयोगाचा दणका!

सरोगसी बाजाराला बालहक्‍क आयोगाचा दणका!

Published On: Apr 09 2018 1:50AM | Last Updated: Apr 09 2018 1:38AMमुंबई : चंद्रशेखर माताडे

गर्भाशय भाड्याने घेऊन मुलांना जन्म देणार्‍या सरोगसीच्या बाजाराला राज्य बालहक्‍क आयोगाने दणका दिला आहे. यासंदर्भात राज्य सरकारला केलेल्या शिफारशीत बाल न्यायालयासमोर सर्व परिस्थिती मांडून त्यासाठी परवानगी घेतल्याशिवाय सरोगसीची प्रक्रिया सुरू करू नये, असे म्हटले आहे. या शिफारशीवर सरकार मान्यतेची मोहोर उमटल्यास  सरोगसीच्या बाजाराला काही प्रमाणात तरी आळा बसण्याची शक्यता आहे.

पदरी दोन मुले असतानाही मुलगाच हवा, या हव्यासापोटी सरोगसीद्वारे पुत्रप्राप्ती करण्याचे प्रकरण उजेडात आल्यानंतर सरोगसी केंद्रांना नियमांच्या चौकटीत बंदिस्त करण्यासाठी बालहक्‍क आयोगाने महत्त्वाच्या शिफारशी केल्या आहेत.

राज्यात सरोगसी केंद्रांचे काम हे भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार चालविण्यात यावे. त्यासाठी राज्यस्तरावर नियंत्रण मंडळ स्थापन करण्यात यावे. प्रत्येक जिल्ह्यात आरोग्य व गृह खात्याच्या प्रतिनिधींबरोबरच नामवंत स्वयंसेवी संस्थांच्या दोन प्रतिनिधींचा समावेश असलेल्या कृती दलाची स्थापना करण्यात यावी. ही कृती दले रुग्णालयांची मान्यता व त्यांची नोंदणी, सरोगेट आई व मूल यांची सुरक्षाविषयक काळजी घेण्याची जबाबदारी पार पाडतील. सरोगसी केंद्र नोंदणीसाठीची कार्यपद्धती व त्यासाठीचे स्वतंत्र प्राधिकरण निश्‍चित करेल. सरोगसी केंद्र सुरू करणार्‍या रुग्णालयांना या  प्राधिकरणाकडे नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

ज्यांना सरोगसी करायची आहे, त्या व्यक्‍तींची कौटुंबिक, सामाजिक व आर्थिक परिस्थिती जाणून घेण्यासाठी व त्या कुटुंबांचे समुपदेशन करण्यासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी व आरोग्याधिकारी एका समितीची स्थापना करतील. ही समिती त्या कुटुंबाचा अहवाल  तयार करेल. हा अहवाल बालहक्‍क न्यायालयासमोर मांडून त्याबाबतची परवानगी घेतल्याशिवाय सरोगसीची प्रक्रिया सुरू करता येणार नाही.

नियंत्रणासाठी आग्रही : घुगे

राज्यात सरोगसीची समोर आलेली प्रकरणे ही अस्वस्थ करणारी असून, या शिफारशींची अंमलबजावणी झाल्यास सरोगसीच्या बाजारीकरणाला आळा बसेल, अशी अपेक्षा बालहक्‍क आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे यांनी व्यक्‍त केली.

Tags : mumbai, mumbai news, Sarogsi Market, Child Rights Commission, bump,