Wed, Nov 14, 2018 19:11होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सचिवांनी अधिवेशनात उपस्थित राहणे बंधनकारक

सचिवांनी अधिवेशनात उपस्थित राहणे बंधनकारक

Published On: Feb 21 2018 5:28PM | Last Updated: Feb 21 2018 5:28PMमुंबई : प्रतिनिधी

विधिमंडळ अधिवेशनात महत्वाच्या चर्चेच्या वेळी समन्वयाच्या दृष्टीने सचिवांची उपस्थिती सभागृह गॅलरीत असणे आवश्यक आहे. मात्र बऱ्याचवेळा  विभागवार चर्चेच्या वेळी विभागांचे सचिव अनुपस्थित असतात. त्यामुळे नेमकी झालेली चर्चा व त्यावरील शासनाची भूमिका स्पष्ट करण्याच्या दृष्टीने आवश्यक माहिती उपलब्ध करून देताना उडणारा गोंधळ लक्षात घेता अधिवेशन काळात सचिवांनी विधिमंडळात पूर्णवेळ उपस्थित रहावे, असे आदेश मुख्य सचिव सुमित मल्लिक यानी दिले आहेत.

विधानमंडळाचे  अर्थसंकल्पीय अधिवेशन २६ फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजामध्ये कोणत्याही बाबींच्या अनुषंगाने कोणत्याही विभागाचा मुद्दा केव्हाही उपस्थित होऊ शकतो. संबंधित मुद्द्यांबाबत कार्यवाही तातडीने होण्यासाठी विभागांच्या सचिवांची मुंबई येथे उपस्थिती आवश्यक असेल.  

विधानमंडळ अधिवेशन काळात सभागृहात ज्या दिवशी त्यांच्या विभागांशी संबंधीत महत्वाचे प्रश्न, लक्षवेधी सूचना, अर्धा तास चर्चा, पुरवणी मागण्यांवरील चर्चा व मतदान व इतर महत्वाचे कामकाज असेल त्या दिवशी सचिवांनी सभागृहातील अधिकारी गॅलरीमध्ये राहावे अशा सूचना सर्व विभागांना देण्यात आल्या आहेत.