Wed, Jun 26, 2019 17:38होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रस्ते विकास; मार्चपूर्वी भूसंपादन करा : मुख्यमंत्री

रस्ते विकास; मार्चपूर्वी भूसंपादन करा : मुख्यमंत्री

Published On: Jan 21 2018 2:49AM | Last Updated: Jan 21 2018 2:49AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

यावर्षी राज्यात सुमारे दोन हजार किलोमीटर लांबीच्या रस्ते विकासाचे टार्गेट ठेवण्यात आले असून हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी राज्यातील रस्ते विकासासाठी आवश्यक ते भूसंपादन मार्चपूर्वी पूर्ण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी जिल्हाधिकार्‍यांना दिले.

केंद्र सरकारच्या भारतमाला या राज्यातील रस्ते विकासाच्या योजनेचा ‘सह्याद्री’ अतिथीगृहात आढावा घेण्यात आला. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सचिव युधीवर मलिक या बैठकीला उपस्थित होते. भूसंपादन करून त्याचा मोबदलाही संबंधितांना तातडीने देण्यात यावा, असे मुख्यमंत्री म्हणाले.

नितीन गडकरी यांनी राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यांत सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कामाचा जिल्हानिहाय आढावा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेतला. केंद्र सरकारकडून मार्च अखेरपर्यंत दीड ते पावणेदोन लाख कोटी रुपयांची रस्त्यांची कामे प्रस्तावित आहेत. रस्ते विकासासाठी लागणार्‍या वन विभागाच्या परवानग्यांबाबत वन विभागाच्या सचिवांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्‍यासोबत बैठक घ्यावी. 

मार्चपर्यंत जिल्हाधिकार्‍यांनी जमीन अधिग्रहीत करून दिल्यास पावसाळ्यापूर्वी काम सुरू करता येतील, असे गडकरी म्हणाले. रस्ते विकासासाठी वन विभागाच्या लागणार्‍या परवानग्या, जमीन अधिग्रहण, जमीन अधिग्रहणातील काही जिल्ह्यांतील अडचणी या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली.