Tue, Jul 23, 2019 04:05होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आंदोलकांना सरकारची भूमिका समजावून सांगा

आंदोलकांना सरकारची भूमिका समजावून सांगा

Published On: Aug 03 2018 2:18AM | Last Updated: Aug 03 2018 1:48AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

राज्य सरकार मराठा आरक्षणासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत असून, मराठा समाजाला टिकाऊ आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र, विरोधक मराठा समाजाच्या आंदोलनाचे राजकारण करत आहेत. हे आंदोलनाच्या आगीत तेल ओतत आहेत. त्यामुळे भाजपच्या आमदारांनी मराठा समाजात जाऊन सरकारची भूमिका समजावून सांगावी, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच शिवसेनाही मराठा आंदोलनाबाबत राजकारण करीत असल्याचा हल्ला त्यांनी चढविल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मराठा समाजाची आरक्षणाची मागणी रास्त असून, राज्य सरकारही या मागणीशी सहमत आहे. मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने केलेल्या कायद्याला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली असल्याने आरक्षण देण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल हाच एकमेव पर्याय आहे. मराठा समाजाची मागणी पाहता राज्य सरकारने आयोगालाही अहवाल लवकर देण्यासंदर्भात विनंती केली आहे, तेव्हा हा अहवाल येण्याची वाट पहावी लागणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. राज्यात पेटलेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी ‘वर्षा’ निवासस्थानी भाजप आमदारांची बैठक घेतली. त्यावेळी राज्य सरकारने मराठा समाजासाठी घेतलेल्या निर्णयांची जंत्री सांगितली. आमदारांनी आपला मतदार संघ आणि जिल्ह्यात मराठा समाजामध्ये जाऊन सरकारने घेतलेल्या निर्णयांची व आरक्षणाबाबतच्या भूमिकेची माहिती देण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

राज्य सरकारने मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कात सवलत, त्यांच्यासाठी स्वतंत्र हॉस्टेल, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत कर्ज आदी योजनांची अंमलबजावणी सुरू केली आहे. मात्र, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून मराठा समाजाच्या आंदोलनाचे विनाकारण राजकारण केले जात आहे. सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेचीही या प्रश्‍नाचे राजकारण करण्याचीच भूमिका आहे; पण सरकार मराठा समाजाच्या बाजूने आहे, ही भूमिका मराठा समाजाला पटवून सांगा, असेही मुख्यमंत्री म्हणाले. मराठा आंदोलनामध्ये घुसून दुसरेच लोक हिंसाचार करीत असल्याचे निदर्शनास आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत सांगितले.

सुरुवातीला मुख्यमंत्र्यांनी आमदारांकडून राज्यातील परिस्थिती जाणून घेतली. आमदारांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्‍नावर तातडीने तोडगा काढण्याची आवश्यकता व्यक्‍त करतानाच जागोजागी विरोधक राजकारण करीत आहेत. हे आंदोलन भडकवून पराभवाचे उट्टे काढण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही काही आमदारांनी केला. राज्य सरकारने मराठा समाजाबाबत घेतलेल्या निर्णयाबाबत यावेळी समाधान व्यक्‍त केले. काही आमदारांनी राज्य सरकारने जाहीर केलेली मेगा भरती थांबवू नये, अशी मागणी केली.