Tue, Oct 24, 2017 16:59
29°C
  Breaking News  

होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुख्यमंत्र्यांनी देसाईंचा राजीनामा फेटाळला!

मुख्यमंत्र्यांनी देसाईंचा राजीनामा फेटाळला!

Published On: Aug 13 2017 2:08AM | Last Updated: Aug 13 2017 2:00AM

बुकमार्क करा

मुंबई : खास प्रतिनिधी

एमआयडीसीसाठी संपादन केलेली जमीन मालकांना परत करून बिल्डरांचा फायदा करून दिल्याचा आरोप विधिमंडळात झाल्यानंतर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शनिवारी सकाळी मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिला. मात्र, तो मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला नाही. स्वतः सुभाष देसाई यांनीच ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली.

विरोधकांकडून देसाई यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर देसाई यांनी राजीनामा द्यावा, अशी जोरदार मागणी विधिमंडळात करण्यात आली होती. त्यापूर्वी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्यावरही आरोप करून त्यांना मंत्रिपदावरून काढण्यासाठी विरोधकांनी आग्रह धरला आहे. अखेर या दोघांचीही चौकशी केली जाईल, त्यात मेहता यांची चौकशी लोकायुक्‍तांमार्फत केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात शुक्रवारीच केली.

मॅग्‍नेटिक महाराष्ट्र या एमआयडीसीच्या योजनेसाठी नाशिक जिल्ह्यातील 600 एकर जमीन संपादित करण्यात आली होती. या जमिनीपैकी 400 एकर जमीन मूळ मालकांना परत करण्यात आली. या जमिनी बड्या बिल्डरांना दिल्या गेल्या असून त्यात हजारो कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे. या प्रकरणी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा राजीनामा घ्या, अशी मागणी होत आहे. 

या पार्श्‍वभूमीवर स्वतः सुभाष देसाई यांनी शनिवारी सकाळी ‘वर्षा’ बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. आपण कोणत्याही चौकशीस सामोरे जाण्यास तयार असून ही चौकशी होईपर्यंत पदावर राहणे उचित वाटत नसल्याचे सांगत देसाई यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांना सोपविला. मात्र, असा राजीनामा देण्याची काहीही गरज नसल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी तो फेटाळला, अशी माहिती देसाई यांनी दिली. यासंदर्भात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री यांच्यात फोनवरून चर्चाही झाल्याचे ते म्हणाले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर सुभाष देसाई यांनी शुक्रवारीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशी सुरू असताना कोणत्याही पदावर राहणारा मी शिवसैनिक नाही, असे त्यांनी ठाकरे यांना सांगितले होते. याप्रकरणी होणार्‍या चौकशीला मी संपूर्ण सहकार्य करणार आहे. चौकशीअंती जे समोर येईल, त्यानंतर जो निर्णय घेतला जाईल तो मला मान्य असेल, अशी प्रतिक्रिया देसाई यांनी दिली.

विरोधकांचीच नि:पक्ष चौकशी करा : उद्धव

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना शिवसेना सुभाष देसाई यांच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट केले.

लाजिरवाणी गोष्ट

स्वतःच भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये बरबटलेले विरोधक तोंड वर करून आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतात, ही गोष्ट लाजिरवाणी आहे, असे उद्धव म्हणाले.एवढे आरोप झाल्यानंतर शुक्रवारी सुभाष देसाई माझ्याकडे आले. त्यांनी संपूर्ण प्रकरण सांगून मुख्यमंत्र्यांनी नि:पक्षपातीपणे चौकशी करण्याचे वचन विधानसभेत दिल्याची माहिती मला दिली आणि एक शिवसैनिक म्हणून मी पदाला चिकटून राहणार नाही, मी राजीनामा देऊन मोकळा होतो. मंत्री म्हणून दबाव येऊ नये. कोणाला वाटत असेल तर मी राजीनामा देतो. त्यानुसार शनिवारी सकाळी ते मुख्यमंत्र्यांकडे गेले, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

उद्धव म्हणाले की, कर आरोप आणि घे राजानीमा, असा पायंडा पडला, तर ते महाराष्ट्राच्या प्रतिमेला साजेसे होणार नाही, घोटाळे केलेल्या विरोधकांची नि:पक्षपातीपणे चौकशी करून जर ते गुन्हेगार असतील, त्यांना त्याची शिक्षा मिळायलाच पाहिजे.

देसाईंचे राजीनाम्याचे नाटक ः विखे - पाटील

सततच्या दुटप्पी भूमिकेमुळे जनमानसात शिवसेनेची प्रतिमा मलिन झाली असून, डॅमेज कंट्रोलसाठी शिवसेनेने उद्योगमंत्र्यांच्या राजीनाम्याचे नाटक केल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे — पाटील यांनी केला. विरोधी पक्षांनी पुराव्यांसह आरोप करून उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या राजीनाम्याची मागणी केली. परंतु, त्यास साफ नकार देत यापूर्वीच्या सरकारच्या काळात कसे गैरव्यवहार झाले, हे सांगून उद्योगमंत्र्यांनी स्वतःचा केविलवाणा बचाव केला. उद्योगमंत्र्यांना त्यांच्या विभागात यापूर्वी गैरव्यवहार झाल्याचे माहिती होते, तर गेली तीन वर्षे ते झोपले होते का, असा सवाल विखे-पाटील यांनी केला. शिवसेनेमध्ये नैतिकता असती तर गैरव्यवहार उघडकीस आल्यावर तातडीने उद्योगमंत्र्यांचा राजीनामा घेतला असता. परंतु, त्यावेळी भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत कानावर हात ठेवले आणि आता जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.