Thu, Jul 18, 2019 02:36होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मराठा आरक्षण लागू होऊ नये ही मुख्यमंत्र्यांची इच्छा!

मराठा आरक्षण लागू होऊ नये ही मुख्यमंत्र्यांची इच्छा!

Published On: Jun 30 2018 1:18AM | Last Updated: Jun 30 2018 1:11AMमुंबई : प्रतिनिधी

मराठा आरक्षण न्यायालयात टिकणार नाही, असे बोलणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या समाजाला आरक्षण लागू होऊ नये, अशी इच्छा असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. मराठा आरक्षणाबाबतचा अहवाल कधी सादर करणार, या न्यायालयाच्या सवालावरून सरकार खरोखरच मराठा आरक्षण लागू करण्यास टाळाटाळ करत असल्याचे स्पष्ट होत आहे, असे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले. राज्य सरकारने सामाजिक न्याय विभागाकडे मराठा आरक्षणाबाबतचा अहवाल तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार या विभागाने भाजपाच्या सारथी नावाच्या संस्थेकडे अहवाल तयार करण्यासाठी दिला आहे.

पण आदेश देऊनही अहवाल तयार होत नाही. यावरून राज्यात मराठा, मुस्लिम आरक्षण लागू होऊ नये ही सरकारची भूमिका असल्याचे स्पष्ट होत आहे. आता न्यायालयाने सवाल उपस्थित केल्यानंतर सरकारला नाईलाजाने अहवाल सादर करावा लागणार असल्याचे मलिक यांनी सांगितले. देशातील व्हीआयपी कल्चर संपविण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगत आहेत. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र आपल्याच कार्यकर्त्यांना चोरून-चोरून मंत्रिपदाचा दर्जा देत व्हीआयपी कल्चर आणत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

देशातील व्हीआयपी कल्चर संपविण्यासाठी मंत्र्यांचा लाल दिवा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे लाल दिव्याशिवाय मंत्री फिरत आहेत. तर मुख्यमंत्री फडणवीस भाजपच्या कार्यकर्त्यांना मंत्रिपदाचा दर्जा देत सुटले आहेत. सिद्धिविनायक मंदिर आणि साईबाबा संस्थानचे अध्यक्ष हावरे यांच्यानंतर आणखी काही कार्यकर्त्याना मंत्रिपदाचा दर्जा देण्याची तयारी असल्याची शंकाही मलिक यांनी व्यक्त केली.