Sat, Mar 23, 2019 16:41होमपेज › Mumbai-Thane-Raigad › हताश काँग्रेसचा हा पोरकटपणा : मुख्यमंत्री

हताश काँग्रेसचा हा पोरकटपणा : मुख्यमंत्री

Published On: Jul 03 2018 2:25AM | Last Updated: Jul 03 2018 2:25AMमुंबई : प्रतिनिधी

काँग्रेसने पत्रकार परिषद घेऊन जणू काही फार मोठा जमीन घोटाळा झाल्याचा आव आणला खरा, पण गेल्या अनेक वर्षांपासून असे अनेक प्रकार होत आहेत. ज्या विषयाची फाईलच मुख्यमंत्र्यांपर्यंत येत नाही, त्यात मुख्यमंत्री कार्यालयाला अकारण गोवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. महाराष्ट्रात भ्रष्टाचाराचे एकही प्रकरण सापडत नाही, यामुळे हताश झालेल्या काँग्रेसच्या पोरकटपणाच्या इतिहासातील हे अतिशय हीन पातळीवरचे प्रदर्शन आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्‍त केली. 

दरम्यान, भाजपचे प्रवक्‍ते माधव भांडारी यांनी काँग्रेस नेत्यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले. भांडारी म्हणाले, नवी मुंबई येथील ज्या जमीन प्रकरणाबाबत आरोप करण्यात येत आहे, ती जमीन सिडकोची नाही, तर शासनाची आहे. मुळात ज्या जमिनीची किंमत 5.29 कोटी रुपये आहे, ती 1700 कोटींची झालीच कशी, असा सवाल त्यांनी काँग्रेसला केला. 4 काँग्रेसने ज्या जमिनीसंदर्भात आरोप केले आहेत, ती जमीन प्रकल्पग्रस्तांना दिल्यानंतर त्यास उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. ही याचिका रद्द करण्यात आली होती. एवढे सारे असताना केवळ दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुळात ही 24 एकर जमीन कोयना धरण प्रकल्पग्रस्तांपैकी एकूण 9 जणांना वाटप करण्यात आली आहे. हा निर्णय जिल्हाधिकार्‍यांच्या पातळीवर होत असतो, त्यात मुख्यमंत्री वा मुख्यमंत्री कार्यालयाचा काहीही संबंध नाही. अशा प्रकारे शेकडो नव्हे तर हजारो जमिनी काँग्रेसच्या आणि पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना दिल्या गेल्या असून त्या प्रकरणांची देखील चौकशी झाली पाहिजे, असे भंडारी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

काँग्रेस नेत्यांवर 500 कोटींचा दावा ठोकणार : आ.प्रसाद लाड

काँग्रेसने केलेल्या आरोपांचे आ. प्रसाद लाड यांनी खंडन केले आहे. मनिष भतिजा आणि संजय भालेराव हे आपले मित्र आहेत पण माझी त्यांच्याशी कोणत्याही प्रकारची व्यावसायिक भागिदारी नाही. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या मुरब्बी आणि ज्येष्ठ नेत्याने निरूपम यांचे ऐकून असे आरोप करावे, हे आश्चर्यकारक आहे. बिनबुडाचे आरोप केल्याबद्दल काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, रणदिप सुरजेवाला आणि संजय निरूपम यांच्याविरोधात 500 कोटींचा मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचे लाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

भाजपची वस्तुस्थिती

या जमिनीचे वाटप 26 फेब्रुवारी 2018 रोजी प्रकल्पग्रस्तांना जमीन वाटप करण्याच्या नियमांना अधीन राहूनच करण्यात आले आहे. ही जमीन कशी वाटप कशी करायची, यासंदर्भातील 20 जून 1973 चा शासकीय आदेश व वेळोवेळी काढण्यात आलेले शासन निर्णयाप्रमाणेच ही जमीन प्रकल्पग्रस्तांना वितरित करण्यात आली आहे. 

सदर जमीन ही पूर्णत: शासनाच्या ताब्यातील असून, ती कधीही सिडकोला हस्तांतरित करण्यात आलेली नव्हती. प्रकल्पग्रस्तांना जमीन वाटप करण्याचे अधिकार हे जिल्हाधिकार्‍यांचे असून, त्यानुसार रायगड जिल्हाधिकार्‍यांनी या वर्ग 1 च्या जमिनी त्यांना असलेल्या अधिकारातच प्रकल्पग्रस्तांना दिलेल्या आहेत.

कोयना प्रकल्पग्रस्तांना 1960 पासून अशापद्धतीने पर्यायी जागा देण्यात येत असून, अजूनही 440 लोकांना जमिनी प्राप्त झालेल्या नाहीत. त्यामुळे जागेच्या उपलब्धतेप्रमाणे आणि प्राप्त अर्जांप्रमाणे जागांचे वाटप करण्यात येते.

कोयना प्रकल्पग्रस्तांना पुणे जिल्ह्यात 3, सोलापूर जिल्ह्यांत 500, सांगली जिल्ह्यात 80, कोल्हापूर जिल्ह्यांत 10 प्रकरणांमध्ये जुनी अट रद्द करून जमीन विक्रीची परवानगी जुन्याच सरकारच्या काळात देण्यात आली आहे.