Thu, Sep 19, 2019 03:28होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मंत्री, आमदारांची उद्या झाडाझडती

मंत्री, आमदारांची उद्या झाडाझडती

Published On: May 20 2019 1:47AM | Last Updated: May 20 2019 1:47AM
मुंबई : विशेष प्रतिनिधी

अखेरच्या टप्प्यातील मतदान आणि जवळ आलेली मतमोजणीची तारीख या पार्श्‍वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. लोकसभेनंतर आता महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सर्व पक्षाचे नेते लागले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यासाठी कंबर कसली आहे. त्याची पूर्वतयारी म्हणूनच फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आमदार आणि मंत्र्यांची मंगळवारी बैठक लावली आहे. यातूनच पुढील संधी कोणाला मिळेल आणि वगळले जाईल हे ठरवण्यात येणार आहे.

राज्यातील लोकसभा निवडणुकीत दिलेल्या कामगिरीबाबतचा आढावा घेण्यासाठी प्रदेश भारतीय जनता पार्टीकडून मुंबईत ही बैठक बोलावण्यात आली आहे. मुंबई भाजपच्या दादरच्या कार्यालयात सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हा आढावा घेतला जाणार आहे, असे कळते. त्याचदिवशी राजधानी दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांच्या बैठकीत संपूर्ण निवडणुकीचा आढावा घेतला जाणार असून, पुढची रणनीती निश्‍चित करण्यात येणार आहे.

विधान परिषद निवडणूक, विधान परिषदेचे सभापतिपद, मंत्रिमंडळातील फेरबदल, राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि विधिमंडळाचे 17 जूनपासून सुरू होणारे पावसाळी अधिवेशन हे विषय सध्या मुख्यमंत्र्यांच्या अजेंड्यावर आहेत. त्याचवेळी राधाकृष्ण विखे-पाटील, जयदत्त क्षीरसागर आणि विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या प्रवेशानंतर त्यांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांवर आहे. तत्पूर्वी, त्यांना लोकसभेत झालेल्या बंडाळ्या, मित्रपक्षांच्या मतदार संघातील भाजपचा रोल आणि नेमून दिलेल्या मतदार संघात आमदार आणि मंत्र्यांनी काय काय प्रयत्न केले, याचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे.