Fri, Jul 19, 2019 05:20होमपेज › Mumbai-Thane-Raigad › हायपरलूप; अभियंता पथक लवकरच पुण्यात

हायपरलूप; अभियंता पथक लवकरच पुण्यात

Published On: Jun 17 2018 1:36AM | Last Updated: Jun 17 2018 12:35AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

मुंबई-पुणे मार्गावर हायपरलूप तंत्रज्ञानावर आधारित अतिवेगवान रेल्वे प्रकल्पाची उभारणी करण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल पडले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंपनीच्या अमेरिकेतील चाचणी केंद्राला भेट देऊन संबंधितांशी चर्चा केली. या चर्चेनंतर व्हर्जिन हायपरलूप आपल्या अभियंत्यांचे पथक लवकरच पुण्याला पाठविणार असून, पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्त्वावर 15 किलोमीटरचा मार्ग तयार करण्यात येणार आहे. हा प्रकल्प यशस्वी झाल्यास मुंबई-पुणे हे अंतर केवळ 20 मिनिटांत कापता येणार आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्याचे शिष्टमंडळ सध्या अमेरिकेच्या दौर्‍यावर आहे. या दौर्‍याच्या अखेरच्या टप्प्यात मुख्यमंत्र्यांनी नेवाडा येथे व्हर्जिन हायपरलूप तंत्रज्ञानाच्या चाचणी केंद्रास भेट दिली. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक रॉब लॉईड यांनी मुख्यमंत्र्यांना प्रकल्पाची संपूर्ण माहिती दिली. मुंबई-पुणे या मार्गावर हायपरलूप तंत्रज्ञानावर आधारित अतिवेगवान रेल्वे प्रकल्पाची उभारणी करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. या प्रकल्पाची व्यावहारिक उपयोगिता पडताळण्यासाठी अभ्यास करण्यात आला आहे. व्हर्जिन हायपरलूपचे संस्थापक आणि अध्यक्ष सर रिचर्ड ब्रॅनसन यांनी मुंबईत आयोजित मॅग्‍नेेटिक महाराष्ट्र परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत फ्रेमवर्क कराराची घोषणाही केली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया आणि मेक इन इंडिया अभियानाला पाठबळ देण्यासाठी ओरॅकलने एक अभियान हाती घेतले आहे. त्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा भाग म्हणून मुख्यमंत्री फडणवीस यांनी ओरॅकलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सॅफ्रा कात्झ यांचीदेखील सॅन फ्रॅन्सिस्को येथे भेट घेतली. मुंबईमध्ये अत्याधुनिक डाटा सेंटर्स सुरू करण्याची ओरॅकलची तयारी आहे.

या संदर्भातील कार्यवाहीसाठी ओरॅकलला आवश्यक ती सर्व मदत देण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. जनसामान्यांना अधिक चांगल्याप्रकारे सेवा प्रदान करण्यासाठी आर्टिफिशियल इंटिलिजन्सचा वापर शासकीय माहितीच्या संदर्भात करता यावा, या हेतूने एक संयुक्‍त गट स्थापन करण्याबाबतसुद्धा यावेळी सहमती झाली. सोबतच आर्टिफिशियल इंटिलिजन्स, फिनटेक, क्लाऊड कम्प्युटिंग इत्यादींसंदर्भातही सविस्तर चर्चा झाली. नागरिकांना आपल्या कामांसाठी अनेक प्रकारची माहिती घेऊन विविध शासकीय विभागांकडे जावे लागते. यापासून त्यांना दिलासा देण्यासाठी एक विशिष्ट प्रणाली विकसित करण्यासंदर्भात राज्य सरकार ओरॅकलसोबत काम करणार आहे.